ऑक्सिजनअभावी कोव्हिड रुग्णालये व्हेंटीलेटरवर

नगर शहरात मंगळवारी प्राणवायूसाठी डॉक्टरांची धावाधाव
ऑक्सिजनअभावी कोव्हिड रुग्णालये व्हेंटीलेटरवर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मंगळवारी सकाळपासून नगर शहरातील खासगी कोव्हिड रुग्णालयांकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला होता.

त्यामुळे खासगी रुग्णालयातील डॉक्टर हतबल होत, त्यांनी त्यांच्या रुग्णालयात दाखल कोव्हिड रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देत वेळप्रसंगी रुग्णांना अन्यत्र हलविण्याची विनंती केली. तसेच ऑक्सिजनसाठी थेट जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत मदतीची विनंती केली. अखेर वरिष्ठ पातळीवरून सूत्र फिरल्याने काही खासगी रुग्णालयांना जिल्हा रुग्णालयातून तर काहींना अन्य पातळीवरून तात्पुत्या स्वरूपात ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात आले.

दरम्यान, मंगळवारी रात्री उशीरा अथवा बुधवारी पहाटेपर्यंत नगर शहरात 30 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली. तर मंगळवारी दिवसभर ऑक्सिजनची टंचाई असणार्‍या खासगी हॉस्पिटलला पर्यायी व्यवस्था करून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली. नगर शहरातील खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.

दुसरीकडे वाढत्या करोना संसर्गामुळे ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन तर मिळत नाहीतच, पण ऑक्सिजन विक्रेत्यांकडून आता ऑक्सिजनचा पुरवठाही थांबला आहे. मंगळवारी काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन काही खासगी कोव्हिड रुग्णालयांत होता. ऑक्सिजन संपला तर रुग्णांवर उपचार करता येणे शक्य होणार नाही, अशी हतबलता काही हॉस्पिटलने रुग्णांच्या नातेवाईकांना बोलून दाखवली. शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात 50 मेट्रीक टन तर उर्वरित जिल्ह्यात 10 मेट्रीक टन अशा प्रकारे दररोज 60 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज असताना मागणीच्या निम्माच ऑक्सिजन मिळत आहे.

त्यामुळे करोना उपचार करणार्‍या डॉक्टरांसह रुग्णांचा जीव टांगणीला होता. यामुळे खासगी डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली. अखेर वरिष्ठ पातळीवरून सूत्र फिरल्याने काही रुग्णालयांना जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असणार्‍या सहा टन ऑक्सिजनमधून ड्युरा सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात आला. तर काहींना एमआयडीसीमधील बंद असणार्‍या कंपन्यांमधून शिल्लक असणारे ऑक्सिजनचे सिलेंडर कोव्हिड रुग्णालयांना देण्यात आले.

दरम्यान, मंळवारी रात्री जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या मोबाईलवरून निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांनी ऑक्सिजनच्या सद्य स्थितीबाबत माहिती दिली. शहरात जवळपास सर्वच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. मात्र, मंगळवारी ज्यांना जादा निकड होती. त्यांना पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत नगरमध्ये 30 टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऑक्सिजनच्या टंचाईमुळे काल दिवसभर नगर शहरातील हॉस्पिटल हे व्हेटींलेटरवर होते.

खासगी रुग्णालयांना प्रशासनाचा असा सल्ला !

जिल्हा प्रशासनाने मंगळवारी खासगी हॉस्पिटला पाठविलेल्या पत्रात जिल्ह्यामध्ये वाढणारी करोना रुग्णसंख्या, शासकीय रुग्णालयांची असलेली क्षमता यामुळे खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा पुरवठा होत नाही. तसेच खाजगी रुग्णालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ऑक्सिजन उपलब्धता व ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे. यामुळे खाजगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनांनी ऑक्सिजन पुरवठादार यांचेकडून विनाखंडीत ऑक्सिजन पुरवठा होईल, याबाबत योग्य ते नियोजन करावे. वाढती करोना रुग्णसंख्या व संभाव्य तिसर्‍या करोना लाटेच्या अनुषंगाने खाजगी रुग्णालयांनी त्यांच्या स्तरावर स्वत:च्या रुग्णालयांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करावे आणि ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट उभारणीबाबत तातडीने कार्यवाही करावी. यामुळे त्यांच्या रुग्णालयाची ऑक्सिजनची गरज भागविणे शक्य होईल, असा सल्ला देण्यात आला आहे. एका प्रकारे प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठा आणि नियंत्रणातून आले हात झटकण्याचा प्रकार आहे.

औद्योगिक कामासह जिल्ह्याबाहेर ऑक्सिजन विक्री बंद

जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी वाढलेली आहे. ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगाने रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी लिक्वीड ऑक्सिजन उत्पादक आणि रिफीलर यांना 100 टक्के साठा हा वैद्यकीय कारणासाठी जिल्ह्यात विक्री करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र, लिक्वीड ऑक्सिजन उत्पादक आणि रिफीलर यांचेकडून लिक्वीड ऑक्सिजनचा वापर औद्योगिक कारणासाठी तसेच जिल्ह्याच्या बाहेर पुरवठा अथवा विक्री सुरू असल्याचे निदर्शानास आले आहे. जिल्ह्यात वाढत्या करोना संसर्ग व त्या अनुषंगाने ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेता जिल्ह्यातील ऑक्सिजनचा जिल्ह्याबाहेर पुरवठा करणे अपेक्षीत नाही. यामुळे लिक्वीड ऑक्सिजन उत्पादक/रिफीलर यांना ऑक्सिजनचा जिल्ह्याबाहेर पुरवठा करण्यास जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com