
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आठ जणांच्या टोळीने खासगी बसवरील चालक व क्लिनरला कट मारल्याचा कारणातून लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. क्लिनरच्या खिशातील 10 हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. सोमवारी पहाटे नगर-औरंगाबाद रोडवरील महाराजा हॉटेलजवळ ही घटना घडली.
जखमी सागर ज्ञानेश्वरराव शिंदे (वय 35 रा. वर्धा) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्रारार शेख (रा. अलमगीर, भिंगार), रेहान शेख (रा. झेंडीगेट), अवेज शेख (रा. जुनी कोर्ट गल्ली), अकीब ऊर्फ चौधरी (रा. बेलदार गल्ली), मोसीन शेख (रा. बेलदार गल्ली), नदीम (पूर्ण नाव माहिती नाही, रा. जुना कोर्टच्या पाठीमागे), गुड्डू फुलारी (रा. बंगाल चौकी), मोजमिल (पूर्ण नाव माहिती नाही, रा. झेंडीगेट) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सागर शिंदे व क्लिनर राठोड हे खासगी लक्झरी बसमध्ये 30 प्रवासी घेऊन पुणे-नगर-औरंगाबाद-नागपूर जाण्यासाठी मुंबई येथून निघाले होते. सुपा (ता. पारनेर) शिवारात त्यांना दुचाकीवरील दोघांनी कट मारल्याच्या कारणातून शिवीगाळ केली होते. त्या व्यक्तीने सागर शिंदे व राठोड यांना,‘तुम्ही नगरमध्ये जाऊ द्या मग समजेल तुम्हाला मी काय आहे ते’, असे म्हणून दम दिला होता. दरम्यान पहाटे 2.40 वाजता बस महाराजा हॉटेलच्या जवळ आली असता तीन दुचाकी बसला आडव्या लावल्या.
आठ जण हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड घेऊन बसमध्ये घुसले. त्यांनी शिंदे व राठोड यांना मारहाण करून राठोड यांच्या खिशातील 10 हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. बसमधील प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर तोफखाना गस्ती पथकाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी लुटारू पळून गेले. दरम्यान पोलिसांनी एकाला पाठलाग करून पकडले. पकडलेल्या लुटारूकडून इतरांची नावे निष्पन्न झाली आहे. शिंदे यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.