खासगी रूग्णवाही चालकांची मनमानी तर शासकीय चालक उपाशी

शासकीय चालकांचे पगार रखडले; वांबोरीसाठी शववाहिनी देण्याची मागणी
खासगी रूग्णवाही चालकांची मनमानी तर शासकीय चालक उपाशी

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यात करोनाचा कहर सुरू असताना करोनाग्रस्तांचा मृतदेह नेण्यासाठी खासगी रूग्णवाहिका चालक आता नातेवाईकांकडे मनमानी पद्धतीने पैसे मागत आहेत. जेवढे पैसे मागितले, तेवढे दिले नाही तर मुजोर खासगी रूग्णवाहिका चालक तो मृतदेह तसाच रूग्णालयात टाकून देत असल्याचा धक्कादायक प्रकार वांबोरीत उघडकीस आल्यानंतर अनेक नागरिकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. तर प्रशासनासह ना. प्राजक्त तनपुरे यांनी याबाबत तातडीने अशा खासगी रूग्णावाहिका चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान खासगी रूग्णवाहिका चालकांची दबंगगिरी समोर आली असतानाच ठेकेदारी पद्धतीने काम करणार्‍या शासकीय रूग्णवाहिका चालकांना गेल्या चार महिन्यापासून पगारच नसल्याची धक्कादायक बाब अधोरेखित झाली आहे. ना. तनपुरे यांनी संबंधित चालकांचे पगार तातडीने करून वांबोरी ग्रामीण रूग्णालयाला शववाहिनी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या पंचवीस दिवसापूर्वी कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाचे प्रमुख डॉ. श्रीकांत पाठक, मेडीकल ऑफीसर भारती पेचे, डॉ. अंजली मंडलीक व त्यांचा सर्व स्टॉप वांबोरीतील सर्व खासगी डॉक्टर रात्रंदिवस करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करत आहेत. परंतु या ठिकाणी रूग्ण मयत झाल्यानंतर त्यांना नेण्यासाठी खासगी रूग्णवाहिका चालक त्यांच्या नातेवाईकांची अडवणूक करून जादा पैसे मागतात. त्यांचे हतबल नातेवाईक क्षणाचा विलंब न करतात तेवढे पैसे पटकन देऊन टाकतात आणि आपल्या मयत रूग्णाची विल्हेवाट लावण्यासाठी पुढच्या दिशेने रवाना होतात. अशा अनेक घटना घडल्या आहेत. परंतु प्रत्येकजण दुःखाच्या छायेखाली असतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणी बोलायला तयार होत नाही.

रविवारी सकाळी 8.45 वाजता मृत घोषित केलेल्या रुग्णाला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पैशाची मागणी करीत रूग्णवाहिका चालकाने वेठीस धरले. या घटनेमध्ये वांबोरीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचा संबंध नाही. वांबोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये एक रुग्णवाहिका उपलब्ध असून यावरील चालक ठेकेदाराच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत होता. परंतु त्या चालकाला गेल्या चार महिन्यापासून ठेकेदाराकडून अद्यापही पगार मिळालेला नाही. त्या ठेकेदाराचा ठेका संपल्यामुळे तो ठेकेदार त्या चालकाचा पगार देण्यास टाळाटाळ करीत आहे. मात्र अत्यावश्यक सेवा म्हणून त्या चालकाला राहुरीच्या तहसीलदारांनी कामावर राहण्यास सांगितले. तो चालक ही आपली सेवा असून आपण जनतेची सेवा केली पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून रात्रंदिवस या रुग्णवाहिकेवर सेवा देत आहे.

त्यामुळे एकीकडे खासगी रूग्णवाहिका चालक लूटमार करीत असताना शासकीय ठेकेदाराकडे काम करणारे चालक मात्र, उपाशीपोटी जीवन जगत आहेत. मंत्री तनपुरे यांनी त्यांचा पगार मिळवून देण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सूचना करून त्यांचा पगार देण्यास भाग पाडावे व त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

करोनाच्या महामारीमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले असून मृत्यू झालेल्या व्यक्तींना नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिका चालकांना जादा पैसे द्यावे लागतात. ना. तनपुरे यांनी वांबोरी ग्रामीण रुग्णालयासाठी एक शववाहिनी उपलब्ध करून द्यावी, त्यावर एक चालक व दोन स्लीपरची नेमणूक करण्यात यावी. या शववाहिनीला कुठलीही आकारणी न ठेवता त्यामध्ये एक दानपेटी बसविण्यात यावी. परिस्थिती पाहून नातेवाईक या दानपेटीमध्ये आपल्या स्वच्छेने रक्कम टाकतील व मरण पावलेल्या व्यक्तींचीही हेळसांड होणार नाही, अशी मागणी होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com