मुख्याध्यापक कार्यालयाचा जबरदस्तीने घेतला ताबा

'या' हायस्कूलमधील प्रकार || 12 जणांविरूध्द गुन्हा
मुख्याध्यापक कार्यालयाचा जबरदस्तीने घेतला ताबा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

12 ते 13 जणांनी येथील चाँद सुलताना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून मुख्याध्यापक कार्यालयाचा ताबा घेतला. शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी शिक्षक जफर हसनमियाँ सय्यद (वय 51 रा. झेंडीगेट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद अब्दुलमतीन अब्दुल रहीम, सय्यद वहाब, मौलाना शफीक रशीद कासमी, शेख गुलाम दस्तगीर, शेख अकील लियाकत, शेख समी इमाम, शेख तन्वीर चाँद, शेख समद वहाब, शेख नवेद रशीद, शेख मुशाहिद लियाकत (पत्ता माहिती नाही) व इतर दोन अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

सोमवारी दुपारी चाँद सुलताना हायस्कूलमध्ये मुख्याधापक कार्यालयात मुख्याध्यापिका गुलनाज युसूफ इनामदार, उपमुख्याध्यापक इलियास गणी तांबोळी व फिर्यादी यांच्यामध्ये नगर शहरातील स्थलांतरीत मुले सर्वेक्षण नियोजनाची बैठक सुरू होती. त्यावेळी वरील 12 ते 13 जणांनी जबरदस्तीने परवानगी न घेता मुख्याध्यापक कार्यालयात घुसून खुर्च्यांचा ताबा घेतला. मुख्याध्यापिकांना तुम्हाला आज पासून बडतर्फ केलेले आहे. तुम्ही आत्तापासून येथे बसू नका, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी दिली.

बळजबरीने अनधिकृत व्यक्तींना हाताशी धरून मुख्याध्यापक कार्यालयाचा ताबा घेतला. हा सर्व प्रकार सुरू असताना फिर्यादी व उपमुख्याध्यापक इलियास गणी तांबोळी यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली. फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर उपमुख्याध्यापकांकडून कार्यालयाच्या चाव्या हिसकावून घेतल्या असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com