
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात रूईछत्तीशी (ता. नगर) येथील एका मुख्याध्यापकासह पाच जणांना मुंबईच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून मुंबई पोलीस त्यांना तपासकामी घेऊन गेले आहेत.
किरण संदीप दिघे (वय 28 रा. बालिकाश्रम रोड, सावेडी), अर्चना आबासाहेब भामरे (वय 23 रा. रूईछत्तीशी), भाऊसाहेब लोहाजी अमृते (वय 54 रा. वाटेफळ ता. नगर), वैभव संजय तरटे (वय 29 रा. घोगरगाव), सचिन दत्तात्रय महानोर (वय 23 रा. थेरगाव ता. कर्जत) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बारावी गणित पेपरफुटी प्रकरण नुकतेच राज्यभर गाजले आहे.
सर्व पेपरफुटीचे प्रकरण गृह विभागाकडून अतिशय गोपनीय पध्दतीने हाताळले जात आहे. गुन्हे शाखेच्या तपासात दादरमधील विद्यार्थ्यांला मिळालेली प्रश्नपत्रिका ही नगरमधील शिक्षकांकडून मिळाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापकांसह पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी 10 हजार रुपयांना विक्री केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. तिच प्रश्नपत्रिका दादर येथील परीक्षा केंद्रावर पकडण्यात आल्याने हा प्रकार उजेडात आला आहे. मुंबईच्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यांच्याकडे दाखल गुन्ह्यात तपास करताना नगर जिल्ह्यातील धागेदोरे हाती लागले. त्यानुसार पथक रूईछत्तीशी गावात आले. तेथून किरण दिघे, अर्चना भामरे, भाऊसाहेब अमृते, वैभव तरटे, सचिन महानोर यांना ताब्यात घेऊन मुंबईला नेण्यात आले.
बारावीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी मुंबईत दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिथे हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास करताना पोलिसांना याचे धागेदोरे नगरच्या रूईछत्तीशी गावात असल्याचे आढळून आले. येथे परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे फोटो काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले. फोडलेल्या या प्रश्नपत्रिकेची प्रत्येकी 10 हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.