यंदा प्राथमिक शिक्षकांच्या केवळ विनंती बदल्या

करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
यंदा प्राथमिक शिक्षकांच्या केवळ विनंती बदल्या

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत शिक्षकांची गर्दी होऊ नये, म्हणून राज्य शासनाने यंदा प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांना स्थगिती दिली आहे. समुपदेशनाद्वारे केवळ विनंती बदल्या कराव्यात, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे यंदा केवळ विनंती बदल्यांचीच प्रक्रिया होणार आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया 10 ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश शासनाने आधी दिले होते. परंतु राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व बदल्यांमध्ये समुपदेशनासाठी होणारी गर्दी पाहता यंदा प्रशासकीय बदल्या न करण्याबाबतच्या सूचना ग्रामविकास विभागाने बुधवारी सर्व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

सद्यस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता सामाजिक अंतर ठेवण्याच्यादृष्टीने तसेच शिक्षकांच्या अपरिहार्य प्रशासकीय बदल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी शिक्षकांची संभाव्य गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने कोणाचीही तक्र्रार येणार नाही, याची खबरदारी घेऊन शासनाच्या सूचनांचे पालन करून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत विनंती बदल्या समुपदेशनाद्वारे करण्यात याव्यात व शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येऊ नयेत. तसेच जिल्हांतर्गत विनंती बदल्यांची कार्यवाही करताना शिक्षकांच्या रिक्त पदांच्या समानीकरणासंदर्भात शासनाचे आदेश कटाक्षाने पाळण्यात यावेत, असे या आदेशात म्हटले आहे.

नाशिकचे शिंदे नवे उपशिक्षणाधिकारी

माध्यमिक विभागात रिक्त असलेल्या उपशिक्षणाधिकारी पदावर नाशिक येथून शिवाजी शिंदे यांची नियुक्ती झाली आहे.

शिक्षकांच्या बदल्यांबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाले. यात प्रशासकीय बदल्यांऐवजी केवळ विनंती बदल्या समुपदेशनाने करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे समुपदेशनाचे नियोजन, तालुकास्तरावर बदली अर्ज गोळा करणे या सर्व प्रक्रियेबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी चर्चा करून बदल्यांची प्रक्रिया केली जाईल. यामुळे यंदा शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या होणार नाहीत.

- रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com