प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवर गंडांतर ?

आदिवासी भागातील बदल्या करण्यास ‘सर्वोच्च’ स्थगिती
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवर गंडांतर ?

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

राज्य सरकराच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्या करण्यास सांगितले असले तरी आदिवासी भागातील (पेसा) शिक्षकांच्या बदल्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत पेसाच्या बदल्या होणार नसल्याने बदलीची प्रक्रियाच पूर्ण होणार नाही. यामुळे यंदा नगर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवर गंडांतर आल्याचे दिसत आहे.

शिक्षक संघटनांच्या आग्रहाखातर राज्य सरकारने वाढत्या करोना संसर्गात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आधी 31 जुलैची मुदत देण्यात आली. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यात करोनाचा प्रकोप वाढला आणि तालुका पातळीवरून बदली पात्र शिक्षकांची बदली पात्र शिक्षकांची माहिती मिळण्यास उशीर झाल्याने पुन्हा ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदत दिली. या दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अन्य संवर्गातील कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या केल्यानंतर प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या न करण्याचा निर्णय घेत, केवळ विनंती बदल्या करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला.

नगर जिल्हा परिषदेत विनंती बदल्या करण्यासाठी कार्यवाही सुरू असतांनाच आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात बदलून आलेल्या शिक्षकांनी आदिवासी भागात नेमणूक मिळावी, तसेच त्या भागात खुल्या आणि अन्य प्रवर्गातील शिक्षकांना आदिवासी भागातून बाहेर काढावे, यासाठी न्यायालयात धाव घेतली.

तर आदिवासी भागातील आदिवासी सोडून अन्य प्रवर्गातील शिक्षकांनी आम्ही मूळचे या भागातील असल्याने आम्हाला या भागातून बाहेर काढू नयेत, यासाठी न्यायालयात गेले. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले. न्यायालयाने पेसा भागातील बदल्या करण्यास स्थगिती दिली आहे.

यामुळे जर पेसा भागातील बदल्या होणार नसल्यास जिल्ह्यातील अन्य भागातील बदल्या करतांना अडचण येणार आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन यंदा शिक्षकांच्या बदल्यांना फाटा देण्याचा अथवा करोना संसर्गानंतर करण्याच्या विचारात आहे. यामुळे यंदा शिक्षकांच्या बदल्यांवर गंडांतर असल्याचे दिसत आहे.

10 तारखेचा मुहूर्त टळणार !

राज्य सरकारच्या आदेशानुसार यंदा प्राथमिक शिक्षकांच्या 10 ऑगस्टपर्यंत विनंती बदल्या करण्याचे सुधारित आदेश होते. मात्र, जिल्हा परिषदेतील वाढत्या करोना संसर्गामुळे विनंती बदल्यांसाठी राबविण्यात येणारी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. यामुळे पेसा भागातील बदल्या बाजूला ठेवून उर्वरित जिल्ह्यातील बदली प्रक्रिया राबवायची ठरल्यास ती देखील होण्याची चिन्हे कमी आहेत. अद्याप शिक्षण विभागाने विनंती बदलीसाठी जिल्ह्यातून शिक्षकांची नावे जमा केलेली नाही. यामुळे शिक्षकांच्या बदल्यांचा 10 ऑगस्टचा मुहूर्त तुर्तास टळणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com