प्राथमिक शिक्षकांच्या सहकार्यातून चंदनापुरीत कोविड केअर सेंटर सुरु

प्राथमिक शिक्षकांच्या सहकार्यातून चंदनापुरीत कोविड केअर सेंटर सुरु

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोनाचा लढा यशस्वी करण्यासाठी आता जि. प. शिक्षकही सरसावले आहेत. तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येत चंदनापुरी येथे सिंधू लॉन्स येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामुळे करोनाबाधीत रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शिक्षकांच्या सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य मिलींद कानवडे यांच्या संकल्पनेतून गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी व तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी साथ देत सर्व जि. प. सदस्य, सभापती सुनंदाताई जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, सर्व सदस्य, पं. स. सदस्य, प्रांतधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुरेश घोलप या सर्वांच्या सहकार्याने कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमास तालुक्यातील जि. प. प्राथमिक शिक्षकांनी भरभरुन प्रतिसाद देत मोठी आर्थिक मदत केली आहे. या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जि. प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीराताई शेटे, जि. प. चे गटनेते अजय फटांगरे, जि. प. सदस्य रामहरी कातोरे, सभापती सुनंदाताई जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, अशोक सातपुते, रमेश गुंजाळ, संतोष मांडेकर, सोमनाथ गुंजाळ, विजय रहाणे, किरण नवले, माधवराव वाळे, शांताराम कढणे, डॉ. बालोडे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, विस्तार अधिकारी के. के. पवार, सुवर्णा फटांगरे यांसह मोजकेच शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने भरभरून मदत केली आहे. जमा झालेला सर्व निधी कोविड केअर सेंटरसाठीच्या सुविधा व औषधोपचारासाठीच वापरला जाणार आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये 50 नॉन ऑक्सिजन बेडची सोय करण्यात आली आहे. यामुळे चंदनापुरीतील सिंधू लॉन्स येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधून करोनाबाधीत रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. सेंटरचे लोकार्पण होताच 26 रुग्ण या केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. लोहारे व डॉ. कौटे हे रुग्णांची तपासणी करून तात्काळ उपचार सुरु करत आहेत.

रुग्णांसाठी वाचनीय पुस्तके येथे उपलब्ध करण्यात आली आहेत. दररोज सकाळी योग व प्राणायामचे धडे देण्यासाठी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दररोज सकाळी नाष्ट्याची सुविधाही करण्यात येणार आहे. प्रत्येक रुग्णाची वैयक्तिक काळजी घेतली जात आहे. संकटकाळात सामान्य जनतेप्रती असलेली सामाजिक बांधिलकी म्हणून सुरु केलेल्या या उपक्रमाबद्दल सर्वच स्तरातून शिक्षकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com