एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचही बँक निवडणुकीत उतरणार
सार्वमत

एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचही बँक निवडणुकीत उतरणार

Arvind Arkhade

सुपा|वार्ताहर|Supa

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतसे गुरुजींचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. जुनी पेन्शन हक्क संघटनन ही पेन्शन प्रश्नावर तयार झालेली संघटना अहमदनगर जिल्ह्यात स्वराज्य मंडळाच्या नावाखाली आगामी बँक निवडणुकीच्या तयारीला लागली असून तालुकावार ऑनलाईन कार्यकारिणी निवडीचे त्यांचे सत्र चालू आहे.

पेन्शन पाठोपाठ एकल शिक्षकांच्या बदली प्रश्नावर एकल शिक्षक मंचची निर्मिती झाली होती. बँक या विषयापासून दूर राहिलेली ही संघटना आता मात्र कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे बँक निवडणूक लढविण्याबाबत अंतिम निर्णयाप्रत आल्याची माहिती समोर आली आहे.

नुकतीच एकल मंचची गुगल मीटद्वारे ऑनलाईन मीटिंग पार पडली. यावर बँक निवडणूक लढविण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे. नगर जिल्ह्यात संघटनेच्या ओळखीपेक्षा मंडळांची ओळख जास्त लक्षात राहते. त्यामुळे संघटन वाढीसाठी व आगामी बँक निवडणुकीसाठी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय सर्वांच्या चर्चेतून घ्यावा लागत असल्याची माहिती एकल मंचचे जिल्ह्याध्यक्ष सुभाष तांबे यांनी दिली.

एक-दोन दिवसांत एकल मंचच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात येऊन मंडळ कार्यकारिणीही लवकरच जाहीर करू असेही तांबे यांनी सांगितले.जिल्हा एकल मंचच्या या निर्णयाने एकल मंचमधील काम करणार्‍या इतर संघटनांच्या पदाधिकार्‍यांपुढे नक्की कुठे काम करायचे हा प्रश्न उभा राहणार आहे.

एकल मंचचा बँक निवडणुकीचा निर्णय त्यांना कितपत फायदेशीर ठरेल की मारक हे भविष्यात समजेलच पण बँक निवडणुकीच्या तयारीला लागलेले सदिच्छा, गुरुकुल, गुरुमाऊली एक व दोन ऐक्य इब्टा ही पूर्वीची मंडळे असताना या निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या स्वराज्य मंडळ व स्थापन होत असलेलं एकलचे मंडळ यामुळे आगामी बँक निवडणुकीत प्रचंड चुरस असेल हे मात्र नक्की.

गुगल मीटद्वारे झालेल्या ऑनलाईन मीटिंगला जिल्ह्यातील एकल शिक्षक बांधव सहभागी झाले असल्याचे समजते एकल मुळे कुणाचा फायदा व कुणाचा तोटा हे सध्या जरी सांगता येत नसले तरी इतर मंडळाच्या नेत्यांना मात्र बँक निवडणूक गांभीर्याने घ्यावी लागेल असे दिसते. बदली विषयावर स्थापन झालेल्या पती पत्नी सेवा मंच बँक निवडणुकीबाबत मात्र अजून शांतच आहे. त्यांचीही भूमिका भविष्यात महत्त्वाची ठरून तेही बँक निवडणुकीत उतरले तर नवल वाटू नये.

अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हा कार्यकारिणीला असून त्यांच्या जिल्ह्याच्या निर्णयात मी हस्तक्षेप करणार नाही. बँक निवडणूक लढविण्याबाबत मंडळ स्थापन करून जर ते बँक निवडणूक लढविणार असतील तर मला माझ्या संघटनेचे कार्यकर्ते म्हणून मला त्यांना पाठबळ द्यावेच लागेल.

एल. पी. नरसाळे, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंच

आगामी बँक निवडणुकीत अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक पती पत्नी सेवा मंच ही आमची संघटना फक्त बदली धोरणासंदर्भात तयार झालेली संघटना असून बँक निवडणुकीत संघटना भाग घेणार नाही. या संघटनेत सर्वच मंडळाचे कार्यकर्ते असून ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या मंडळात काम करण्याचा पर्याय खुला आहे.

अंबादास काकडे, संस्थापक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक पती पत्नी सेवा मंच

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com