...अन् प्राथमिक शाळेची घंटा वाजली

ल. भा. पाटील विद्यालयाच्या बैठकीत पालकांचा एकमुखी ठराव । शहरातील पहिलीच शाळा
...अन् प्राथमिक शाळेची घंटा वाजली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना महामारीमुळे तब्बल दीड वर्षे बंद असलेल्या माध्यमिक शाळा झाल्या होत्या, तरी प्राथमिक विभाग मात्र बंदच होता. शहरातील एका शाळेने मात्र पालकांच्या समतीने आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. रयत शिक्षण संस्थेच्या कापडबाजारातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेने पहिली ते चौथीचे वर्ग भरविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आजपासून वर्ग सुरू झाले.

रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शाळेच्या पालक-शिक्षक सहविचार सभेत प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक विभागीय अधिकारी काकासाहेब वाळुंजकर, मुख्याध्यापक शिवाजी लंके, जालिंदर सिनारे, राजेंद्र देवकर, इमरान तांबोळी आदींसह शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांनी संमतीपत्र भरून दिले. शाळेच्या पालक शिक्षक पालकांची बैठक शनिवारी पार पडली. यामध्ये पालकांनी शाळा सुरु करण्याची मागणी लाऊन धरली. सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला असता सर्व पालकांनी हातवर करुन शाळा सुरु करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला. या बैठकित शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, शाळेत येण्याचे नियोजन, कोणत्या वर्गाची कोणत्या दिवशी उपस्थिती, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्याची खबरदारी याबाबत नियोजन करुन पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी पांडुळे म्हणाले की, कोरोनानंतर शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष शाळेत शिक्षणाची गरज आहे. या परिस्थितीला सामोरे जाताना शिक्षक व पालकांनी एकमेकांना सहकार्य करुन वाट काढायची आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना वेळ देऊन त्यांच्यामध्ये मोबाईलऐवजी पुस्तकांची आवड निर्माण करावी. सहज जीवनोपयोगी शिक्षण देऊन संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक व पालकांनी योगदान देण्याचे सांगितले. समजेल अशा भाषेत शिक्षकांनी ज्ञानदान करावे व पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांना दिशा देण्याचे वाळुंजकर यांनी सांगितले.

मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी गणित व इंग्रजीचा बाऊ न करता विद्यार्थ्यांना कृतीवर आधारित शिक्षण द्यावे. इंग्रजी माध्यमांचा ओढा आता मराठी माध्यमांकडे वळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इमरान तांबोळी यांची शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षण तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला साळुंके यांनी केले. आभार सुजाता दोमल यांनी मानले. बैठक यशस्वी होण्यासाठी मीनाक्षी खोडदे, शितल रोहकले, इंदुमती दरेकर, जयश्री खंदोडे, सचिन निमसे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com