20 पेक्षा कमी पटसंख्येच्या 695 प्राथमिक शाळा

शाळा बंदचा निर्णय झाल्यास 10 हजार विद्यार्थी अन् 1 हजार 321 शिक्षकांचा प्रश्न || जिल्हा परिषद एकूण शाळा 3 हजार 568 || 1 ते 20 पटसंख्येच्या शाळा 695 || या शाळांवरील शिक्षक 1 हजार 321 || या शाळांतील विद्यार्थी 10 हजार 322
20 पेक्षा कमी पटसंख्येच्या 695 प्राथमिक शाळा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. याबाबतची माहिती राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडून मागण्याव्यात येत आहे. नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 3 हजार 568 शाळा असून त्यापैकी 695 शाळा 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. त्यावर 1 हजार 321 शिक्षक कार्यरत असून 10 हजार 322 विद्यार्थी येथून शिक्षण घेत आहेत. ही माहिती आज बुधवार (दि.28) रोजी राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. जर राज्य सरकारने या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास संबंधित शिक्षक व विद्यार्थ्यांचे काय होणार हा प्रश्न आहे.

राज्यातील शून्य ते 20 विद्यार्थिसंख्या असलेल्या शाळा किती आहेत, या शाळा बंद करण्याची विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे, याची माहिती शालेय शिक्षण विभागाने मागवली आहे. त्यामुळे कमी पटसंख्येच्या शाळा राज्य शासनाकडून बंद केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आहेत. करोनामुळे अर्थव्यवस्थेवरील परिणामांबाबत वित्तीय उपाययोजना करण्याअंतर्गत पद भरती बंदीच्या अनुषंगाने विविध विषयांबाबतची माहिती आणि स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त आणि प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संचालकांकडून मागवली आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे प्रयत्न यापूर्वीही शासनाकडून झाले होते. मात्र, त्यावेळी शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली, तसेच विरोधही झाला. आता शासकीय पत्रातूनच कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे.

जिल्हानिहाय विद्यार्थिसंख्या, संच मान्यतेनुसार मंजूर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदे याबाबतची माहिती, जिल्हानिहाय अतिरिक्त शिक्षक असल्यास त्या शिक्षकांची माहिती, अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती 28 ऑगस्ट 2005 च्या शासन निर्णयानुसार संचमान्यतेनुसार शिक्षक पदांची मागणी केली आहे किंवा कसे, राज्यात शून्य ते 20 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती आहेत, या शाळा बंद करण्याची विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने शिक्षणाधिकार्‍यांकडून मागवली आहे. नगर जिल्हा परिषदेतून ही माहिती शिक्षण संचालक कार्यालयाकडे आज पाठवण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com