
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पिंपळगाव उज्जैनी (ता. नगर) येथील उज्जैनी मातेच्या मंदिरात तीन महिन्यांपूर्वी पहाटे झालेल्या चोरीचा एमआयडीसी पोलिसांनी तपास केला. चोरी करणारे हे मंदिराचे आजी-माजी पुजारीच असल्याचे समोर आले आहे.
मंदिरातील सध्याचा पुजारी किसन नरहरी बोराडे व पूर्वीचा पुजारी बाळासाहेब भानुदास चौधरी (दोघे रा. पिंपळगाव उज्जैनी) यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडील मंदिरातून चोरलेला एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात जगन्नाथ विश्वनाथ मगर यांनी फिर्याद दिली होती की, पिंपळगाव उज्जैनीचे ग्रामदैवत उज्जैनी माता मंदिरात देवीच्या गाभार्याचे कुलूप तोडून चोरी झाली आहे.
या गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलिसांनी केला असता सदरची चोरी पुजार्यांनी केल्याचे समोर आले. सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत दोन्ही पुजार्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रक्कम, दागिने असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.