
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे 500 व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. नगर शहर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. संबंधीत व्यक्तींना नोटीसा पाठविण्यात येणार असून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले जाणार असल्याची माहिती नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी दिली. मोहरम उत्सवास सुरूवात झाली आहे.
उत्सव काळात गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुमारे 500 व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी त्यादृष्टीकोणातून नियोजन सुरू केले आहेत. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील 155 व्यक्तींना सीआरपीसी 107 प्रमाणे नोटीस देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहेत. यामध्ये कोतवाली 53, तोफखाना 62 व भिंगार कॅम्प हद्दीतील 40 व्यक्तींचा समावेश आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 24 गुन्हेगारांना सीआरपीसी 110 प्रमाणे नोटीस देण्यात येणार आहेत. त्यांच्याकडूनही प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहेत.
यामध्ये तोफखाना हद्दीतील 22 व भिंगार हद्दीतील दोन गुन्हेगारांचा समावेश आहे. गैरवर्तन करण्याची शक्यता असणार्या 127 व्यक्तींना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस देण्यात येणार आहेत. यामध्ये कोतवाली हद्दीतील 22, तोफखाना हद्दीतील 45 तर भिंगार हद्दीतील 50 व्यक्तींचा समावेश आहे. मोहरम काळात गैरवर्तन केल्यास अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक कातकडे यांनी सांगितले. मोहरम मिरवणूक मार्गात अडथळा निर्माण होणार नाही यासाठी नगर शहर हद्दीतून 175 व्यक्तींना हद्दपार करण्यात येणार आहे. त्यांना सीआरपीसी 144 (2) प्रमाणे नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यांना मोहरम मिरवणूकीच्या वेळी हद्दीतून हद्दपार करण्यात येणार आहे.
यामध्ये कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून 50, तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतून 45 तर भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून 80 व्यक्तींना हद्दपार केले जाणार आहेत. पोलिसांनी त्यादृष्टीकोणातून नियोजन सुरू केले आहेत. त्यांना लवकरच नोटीस देवून प्रतिबंधक कारवाई केली जाईल, असे उपअधीक्षक कातकडे यांनी सांगितले.
कत्तलची रात्र मिरवणुकीत टेंभ्याला परवानगी द्यावी, अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांकडून शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आली. मोहरम सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला आमचे सहकार्य राहील, असे आश्वासनही यावेळी उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिले. मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत विविध संघटना व यंग पार्ट्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. टेंभ्यांना परवानगी का नाकारण्यात आली होती, बंदी का घालण्यात आली होती, याची माहिती घेतली जाईल. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असे अप्पर अधीक्षक अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.