महिलेला आत्महत्येपासून रोखण्यात दोघे पोलीस यशस्वी

कामगिरीचे अधिकार्‍यांनी केले कौतुक
महिलेला आत्महत्येपासून रोखण्यात दोघे पोलीस यशस्वी

देवगडफाटा |वार्ताहर| Devgad Phata

घरगुती वादामुळे प्रवरासंगम येथे गोदावरी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या इराद्याने श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून आलेल्या विवाहित तरुणीला एका महिला पोलिसासह दोघा पोलीस कर्मचार्‍यांनी उडी घेण्यापासून प्रयत्नपूर्वक रोखले. तिला शांत करून बोलते करत तिचे समुपदेशन करून तिला निर्णयापासून परावृत्त केले व नातेवाईकांच्या घरी पोहच करून तिचा जीव वाचवला. पोलिसांच्या या कामगिरीचा अधिकार्‍यांनी गौरव केला.

याबाबत माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील एक 30 वर्षीय विवाहित महिला प्रवरासंगम परिसरात प्रवरा-गोदावरी पुलावर आली होती. पुलावरून उडी घेऊन ती आत्महत्या करणार असल्याची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन पवार व महिला पोलीस मनीषा ढाणे यांनी तातडीने धाव घेत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ती तरुणी काही ऐकण्याचा मन:स्थितीत नव्हती. पोलिसांनी तिला समजावण्याचा प्रयत्न करत आधी तिला शांत केले.

यानंतर तिला बोलण्यात गुंतवत आत्महत्येचा निर्णयापासून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे थोडक्यात हा अनर्थ टळला. त्यानंतर महिलेला तिच्या नातलगांकडे पोहच करण्यात आले. आत्महत्या करण्यास निघालेल्या तरुणीचे प्राण वाचल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन पवार, व महिला पोलीस मनीषा ढाणे या दोन पोलिसांचे कौतुक होत आहे. या दोन्ही पोलिसांचा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी गौरव केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com