करोनाला रोखण्यासाठी दोन डोस घेणे व्यावसायिकांना बंधनकारक

मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण || नियमाचे पालन करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
करोनाला रोखण्यासाठी दोन डोस घेणे व्यावसायिकांना बंधनकारक

राहाता |वार्ताहर| Rahata

राहाता शहरात करोना तसेच नवीन ओमिक्रॉन संसर्गाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी शहरातील व्यावसायिकांनी लसीकरणाचे दोन डोस व करोना चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे. करोना संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी नगरिकांनीही लसीकरण करून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांनी केले आहे. ज्या व्यावसायिकांनी दोन डोस किंवा करोना चाचणी केली नाही त्यांच्यावर कालपासून कारवाई सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षापासून करोनाच्या वाढत असलेल्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण देशात या आजाराने थैमान घातले. परिणामी करोना संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र व राज्य सरकारने गर्दी होणार्‍या ठिकाणी निर्बंध आणून मर्यादित व्यावसायिकांना नियमाचे पालन करून व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली. परंतु असे होऊनही करोनाचा प्रादूर्भाव कमी होत नसल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन परिस्थिती निर्माण करण्याची वेळ प्रशासनाला घ्यावी लागली.

करोना दुसर्‍या लाटेचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना ऑक्सिजन व बेड तसेच रेमडीसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध झाले नाही. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. करोनापासून बचाव व्हावा यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांसाठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन लस बाजारात उपलब्ध करत करोनावर मात करण्यासाठी उपाय शोधला. परंतु सुरुवातीला लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी फारशी उत्सुकता दाखवली नंतर नाही. परंतु केंद्र व राज्य शासन यांनी सरकारी कार्यालय, जिल्हा बाहेर प्रवास करण्यासाठी, परदेशात जाण्यासाठी अशा विविध ठिकाणी लस घेणार्‍या नागरिकांना सुविधा दिल्या जाणार असल्याचे जाहीर केल्याने अनेक नागरिकांची लस घेण्यासाठी झुंबड उडाली. अनेक ठिकाणी लसीची कमतरता जाणवली. परंतु लसीकरणाची मोहीम सातत्याने सुरू राहिल्याने राहाता शहर परिसरात लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.

त्याचबरोबर करोना प्रादूर्भाव कमी झाल्याने केंद्र व राज्य सरकारने सर्वच ठिकाणी नियम शिथील करून व्यवहार सुरू करण्यासाठी परवानगी दिली. गेल्या महिन्यापासून करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने डोके वर काढल्याने केंद्र व राज्य सरकारने पुन्हा गर्दी होणार्‍या ठिकाणी निर्बंध लागू केले. या निर्बंधाचे काटेकोर पालन व्हावे व करोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी शुक्रवारपासून राहाता शहरातील व्यावसायिकांनी लसीकरणाचे दोन डोस व आरटीपीसीआर चाचणी केली की नाही याची माहिती घेण्याकरिता नगपरिषदेचे कर्मचारी यांना बरोबर घेऊन मोहीम सुरू केली आहे.

ज्या व्यावसायिकांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले नाही किंवा प्रत्येक आठवड्यात केली जाणारी करोना चाचणी केली नाही अशा व्यावसायिकांचे दुकान सील केले जाणार असून व्यावसायिकांनी तात्काळ लसीकरणाचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. शहरातील नागरिकांनी करोना तिसर्‍या लाटेचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात तात्काळ लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सोशल डिस्टंसिंगचे पालन तसेच मास्क वापर करून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियमाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रकांत चव्हाण यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.