जोगेश्‍वरी आखाडा संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांचे सह्यांचे अधिकार काढले

संचालक मंडळाच्या निर्णयामुळे राहुरी तालुक्यात खळबळ
जोगेश्‍वरी आखाडा संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांचे सह्यांचे अधिकार काढले

राहुरी (तालुका प्रतिनिधी) / rahuri - राहुरी तालुक्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या व एकेकाळी जिल्ह्यात नावाजलेल्या जोगेश्‍वरी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी असलेले जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष शिवाजीराव डौले व सचिव शिवाजी खामकर यांचे सह्यांचे अधिकार संचालक मंडळाकडून काढून घेण्यात आले आहेत. संचालक मंडळाच्या या निर्णयामुळे राहुरीच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

राहुरीच्या जोगेश्‍वरी सेवा सहकारी सोसायटीत माजी खा. प्रसादराव तनपुरे व राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखालील दोन गटांतच निवडणूक होऊन शिवाजीराव डौले यांच्या मंडळाचे सात तर कारखान्याचे संचालक विजयराव डौले यांच्या गटाचे सहा संचालक निवडून आले होते. गेल्या साडेचार वर्षांपासून शिवाजीराव डौले हे संस्थेचे चेअरमन म्हणून कामकाज पहात होते. परंतु त्यांच्याच गटाचे नगरसेवक प्रकाश भुजाडी, संदीप भोंगळ, सौ. अलका भुजाडी, विद्यमान उपाध्यक्ष चंद्रभागा काळे, रोहिदास धनवडे, दादासाहेब सरोदे, ज्ञानदेव काळे, प्रदीप भुजाडी, सुरेखा गुंजाळ आदींसह विरोधी विजयराव डौले यांच्यासह मारुतराव हारदे, ज्ञानदेव हारदे, भगवान राजगुरू, रमेश भुजाडी आदी संचालकांच्या स्वाक्षरीने अहमदनगर जिल्हा बँकेचे राहुरी शाखेत विद्यमान चेअरमन शिवाजीराव डौले व सचिव शिवाजी खामकर यांचे पशुपालन कर्ज वगळता संस्थेचे करंट अकाउंट व इतर व्यवहार करण्यासाठी सह्यांचे अधिकार स्थगित करावे, अशी मागणी बँक व्यवस्थापनाला पत्राद्वारे करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे संस्थेच्या सत्ताधारी मंडळात उभी फूट पडतानाच यामागे नेमकी कोणती कारणे आहेत? याची सभासदांमध्ये चर्चा होत आहे. विरोधी गटातून निवडून आलेले संस्थेचे माजी सचिव भागवत उर्फ भाऊसाहेब गुंजाळ यांना मात्र, दोन्ही गटांनी जाणीवपूर्वक अलिप्त ठेवल्याचे दिसून आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com