नगर- औरंगाबाद सीमेवर नेवासा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नगर- औरंगाबाद सीमेवर नेवासा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

देवगडफाटा |वार्ताहर| Devgad Phata

करोना आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाबंदीची घोषणा केली आहे. त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हा नाकाबंदी अंमलबजावणीसाठी पोलीस खाते 22 एप्रिलपासून अलर्ट आहे. राज्यात जिल्हा वाहतुकीची बंदी लागू करण्यात आली असल्याने वैद्यकीय, दुःखद घटना किंवा अत्यावश्यक कारणाशिवाय जिल्ह्याची हद्द सोडता येणार नाही. पोलिसांची नाकाबंदी चांगल्या पध्दतीने सुरु आहे.

पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उभे आहेत. नगर जिल्ह्यासह शेजारील औरंगाबाद जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढल्याने सतर्कतेचा उपाय म्हणून अहमदनगर औरंगाबाद सीमेवर नेवासा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. पासधारकांनाच नगर जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूस पाणी असल्याने नावेद्वारे कोणी जिल्ह्यात प्रवेश करू नये यासाठी त्या ठिकाणीही लक्ष ठेवले जात आहे,

नेवासा पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातील नियम तोडून बाहेरून येणार्‍यांना ‘नो एन्ट्री’ केली आहे. विशेष म्हणजे, जवळच्या खेड्यापाड्यांतूनही कोणी येणार नाही, याची काळजी घेतली जाते. पास असणार्‍यांनाच नगर जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. त्या पासची व त्या वाहनांचीही पाहणी करून मगच त्या वाहनाला अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश दिला जातो. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचे कायगाव येथे चेक पॉइंट आहे ते नगर जिल्ह्यातील वाहनधारकांना ई पास असल्याशिवाय प्रवेश देत नाही.

जिल्ह्याच्या सीमा ‘सील’ केल्या आहेत. नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे व त्यांचे सहकारी व आरोग्य अधिकारी, महसूल अधिकारी आपले कर्तव्य बजावत आहेत.

नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच टोका, प्रवरासंगम याठिकाणी औरंगाबाद-पुणे महामार्गावर दोन्ही सीमा येतात. या ठिकाणी रात्रंदिवस पहारा देताना पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे.

पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सतर्कता बाळगली आहे. त्यांच्यासह त्यांचे सहकारी चेक नाक्यावर स्वतः थांबून लक्ष ठेवून आहे. नियम मोडणार्‍यांवर कारवाई देखील केली जात आहे.

टोका येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बोरुडे यांनी प्रवाशांचे चेकअप करण्यासाठी महसूल, आरोग्य विभाग, पोलीस कर्मचारी यांना मंडप टाकून बसण्याची व्यवस्था केली आहे

पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, प्रदीप शेवाळे, विजय ठाकूर समाधान भटेवाड, हवालदार राजू घोरपडे, श्री. कनगरे, लबडे, राहुल यादव, कामगार तलाठी म्हसे व आरोग्य कर्मचारी चेक पोस्ट वर लक्ष ठेवून आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com