स्वत:चे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारवर टीका

प्रविण दरेकर : केंद्राने राज्याला ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करून दिला
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारवर टीका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्राने रेमडेसिवीर व ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करून दिल्यावरही राज्य सरकार केंद्रावर टीका करत आहे. तसेच महाराष्ट्राने सर्वात जास्त लसीकरण केले असे राज्य सरकार म्हणत असतांना केंद्र सरकारने लस उपलब्ध करून दिल्याने ते शक्य झाल्याचा विसर राज्य सरकारला पडला असावा, असा खोचक सवाल राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

केंद्राकडून राज्याला 1 हजार 750 मॅट्रिक टन ऑक्सिजन साठा मिळत असून 4 लाख 35 हजार रेमडेसिवीरचे इंजेक्शन मिळालेले आहेत. परंतु राज्यातील यंत्रणा सक्षम करण्यात राज्य सरकार कमी पडले असल्यामुळे कदाचित आपले अपयश झाकण्यासाठी केंद्रावर टीका करत असल्याचे दरेकर म्हणाले. राज्याला मदत करणे ही केंद्राची जबाबदारी, कर्तव्य आहे. त्यामुळे राज्याला माल उपलब्ध करण्यासाठी केंद्राशी समन्वय राज्य सरकारणे साधला पाहिजे असा सल्लाही दरेकर यांनी नगरमध्ये दिला.

विरोधी पक्षनेते दरेकर मंगळवारी नगर येथे आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी करोना संबंधीच्या उपाययोजनांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा आणि शहरातील उपाययोजनांसंबंधी त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आ. बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, शहराध्यक्ष भैय्या गंधे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा 60 ऐवजी 50 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.

10 टन कमी ऑक्सिजन मिळत असल्याचे मला सांगण्यात आलेले आहे. इंजेक्शनचा पुरवठा व्हायला पाहिजे व त्याच्यासाठी ज्या कंपन्या आहेत, त्यांच्याशी बोलून जास्तीत जास्त इंजेक्शनला नगरला कसे उपलब्ध होतील याची निश्चितपणे काळजी घेतली जाईल. खाजगी हॉस्पिटलला ऑक्सिजन व इंजेक्शनचा तुटवडा आहे, पण शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत. इंजेक्शन खासगी हॉस्पिटलमध्ये मिळत नसल्याबाबत दरेकर म्हणाले, मी जिल्हाधिकारी व आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत. अशा प्रकारे रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिवीर आणायला सांगू नका, तसे आदेश संबंधितांना देण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

संकटाच्या काळात कोणीही राजकारण करता कामा नये. केंद्र व राज्य सरकारने एकत्रित काम केले पाहिजे. परंतु प्रत्येक वेळेला आपले अपयश झाकण्यासाठी कुठल्याही गोष्टीत केंद्रावर टीका केली जात असल्याचे दिसून येते. ते योग्य नाही. सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले, ते तेवढी लस मिळाली म्हणूनच झाले ना? त्यावरून टीका करण्यात काय अर्थ आहे? यामध्ये राज्याचीही जबाबदारी आहे. केंद्र सरकारसोबत समन्वय ठेवून जेवढे सलोख्याचे वातावरण ठेवले जाईल, तेवढ्या जास्त सुविधा आपल्याला मिळतील. मात्र, आपल्या यंत्रणा सक्षम करण्यात आपण कमी पडलो म्हणून केंद्राकडे बोट दाखविणे बरोबर नसल्याचे त्यांनी सांगितले.

सत्ताधार्‍यांवर संताप व्यक्त करणारा कौल

एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यावर होणार्‍या पोटनिवडणुकीत त्यांच्या कुटुंबातीलच सदस्य निवडून येतो. महाराष्ट्रात आजवर तसेच चित्र पहायला मिळाले आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ मात्र याला अपवाद ठरला आहे. तेथील मतदारांनी भावनेपेक्षा विकास आणि सध्याची परिस्थिती पाहून सत्ताधार्‍यांवर संताप व्यक्त करणारा कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com