
अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यात करोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत. या आदेशाची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी भरारी पथक नेमण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी येथे दिली.
तर आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्र पाठवून खासगीच्या शुल्क आकारणीचा तपासणी अहवाल तीन दिवसात शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात 14 तालुक्यासाठी 14 आणि मनपा हद्दीत 1 अशी 15 तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी दिली.
करोनाच्या रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी राज्य शासनाने 21 मे रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करून दिली आहेत. त्याचबरोबर करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय 23 मे रोजी घेण्यात आला असून 30 जूनरोजीच्या शासन निर्णयानुसार खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दर निश्चित केले आहेत.
तसेच खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देणे व त्याच्या अधिसूचनेच्या प्रभावी अमंलबजावणीचेही निर्देश देण्यात आले आहेत.
नगरमध्ये कॅशलेस नको रे बाबा...!
नगरशहरात खासगी रुग्णालयात वेगवेगळ्या आरोग्य विमा कंपन्यांना कॅशलेससाठी डावलण्यात येत आहे. जर करोना बाधितांचे नातेवाईक रोख पैसे भरण्यास तयार असतील तर खासगी विमा कंपन्यांचे आरोग्य कवच असलेल्या रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. अन्यथा आरोग्य विमा असणार्यांना बेड शिल्लक नाही, असे सांगत बाहेरचा रस्ता दाखविण्यात येत आहे. यामुळे नगरमध्ये आरोग्य विमा कवच असतांनाही नागरिकांना पदरमोड करून करोना उपचार करावे लागत असून त्यानंतर पुन्हा उपचारावर झालेला खर्चाची कागदपत्रे विमा कंपन्यांना सादर करून उपचारावरील भरपाई घेण्याची वेळ आली आहे. यामुळे नगरमध्ये खासगी रुग्णालयात करोना रुग्णांना कॅशलेस नको रे बाबा...! असे सांगतांना दिसत आहेत.