
नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa
नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील मोबाईल दुकानातून मोबाईल चोरीचा प्रयत्न करणार्या दोघा चोरट्यांना पकडण्यात यश आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी पैठण येथील दुसरा मिरजगाव येथील आहे.
याबाबत महेश रामचंद्र सुडके (वय 30) धंदा-मोबाईल शॉपी दुकान चालक रा. प्रवरासंगम ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, शनिवार 6 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास प्रवरासंगम येथील त्यांच्या मोबाईल शॉपी शेजारील स्टोअररुममध्ये काटकोर टावर चव्हाण (वय 34) रा. म्हारोळा ता. पैठण जि. संभाजीनगर, अटल्या ईश्वर भोसले रा. मिरजगाव ता. कर्जत यांनी संगनमत करुन माझ्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने माझ्या स्टोअररुमच्या दरवाजाच्या टांबीने कुलूप तोडून मोबाईल शॉपीमधील मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला.
या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 685/2022 भारतीय दंड विधान कलम 380, 511 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे करत आहेत.