करोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रवरानगर परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषित
सार्वमत

करोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रवरानगर परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषित

तहसिलदार कुंदन हिरे यांनी केले आदेश जारी

Arvind Arkhade

शिर्डी|प्रतिनिधी|Shirdi

राहाता तालुक्यातील मौजे लोणी खु. (प्रवरानगर) परिसरात करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. यात, लोणी खु. (प्रवरानगर) गावातील हॉटेल आशा, साईनाथ कार्यालय परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. तसेच सदर क्षेत्रातील नागरिकांचे तसेच वाहनांचे आगमन व प्रस्थान तसेच वाहनांचे आवागमन प्रतिबंधित करण्यात आले आहे.

राहाता तहसिलदार तथा इन्सीडंट कमांडर कुंदन हिरे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी दिनांक 06 ऑगस्ट, 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रात नागरिक आणि वाहनांच्या ये-जा करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी, असे आदेशित करण्यात आले आहे. यात, कोअर एरिया प्रतिबंधीत करणे, आत किंवा बाहेर जाण्याचा मार्ग बॅरिकेटींग करावा,अत्यावश्यक सेवा व तातडीची वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही प्रकारची ये-जा होणार नाही व सदर प्रतिबंधित क्षेत्रामधील व्यक्ती घर सोडून येऊ शकणार नाही, प्रतिबंधित क्षेत्रात जाणार व्यक्ती तपासणी केल्याशिवाय आतमध्ये न सोडणे.

प्रतिबंधीत क्षेत्रात जाणार्‍या/येणार्‍या व्यक्तींच्या दैनंदिन नोंदी ठेऊन साथरोड सर्वेक्षणामार्फत पाठपुरावा करण्यात यावा, प्रतिबंधीत क्षेत्रात विशेष पथकाद्वारे आदेशापासून 14 दिवस पावेतो घरोघरी सर्वेक्षण करुन संशयित रुग्णांचा शोध घेणे, शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे संशयितांचे तपासणी नमुने घेणे, सर्वप्रकारच्या धार्मिक व सामुदायिक कार्यक्रमाला बंदी, अत्यावश्यक कारणाशिवाय प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यक्तींना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर निघण्यास प्रतिबंध आहे.

तसेच समन्वय अधिकार्‍यांनी प्रतिबंधात्मक क्षेत्रात जिवनावश्यक वस्तूंचा घरपोहोच सशुल्क पुरवठा करणे, सामाजिक विलगीकरणाचे कटाक्षाने पालन करणे, मशिद, मंदिर या ठिकाणी प्रार्थनेसाठी तसेच नमाज पठण, इफ्तार यासाठी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेणे, प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण, वैद्यकीय सुविधा व इतर समन्वयकाची जबाबदारी तालुका आरेाग्य अधिकारी यांची राहील.

दूध, किराणा, भाजीपाला व इतर जिवनावश्यक वस्तु यांचे नियोजन संबधित सहायक नियंत्रण अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी करावे. प्रतिबंधीत क्षेत्रासाठी 24 बाय 7 पोलीस बंदोबस्त पोलिस निरिक्षक, लोणी यांनी लावावा असे आदेशित करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com