प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशाची स्थापना

आ. विखेंच्या आवाहनाला गणेश मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशाची स्थापना

लोणी |वार्ताहर| Loni

प्रवरा उद्योग समुहाच्या गणेशाची स्थापना साध्या पध्दतीने करण्यात आली.आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून प्रवरा परिसरातील 27 गावांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचे ठराव पोलीस प्रशासनाकडे दिले आहेत.

प्रवरा उद्योग समूहाच्या गणेश उत्सवाची सुरूवात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या कार्यस्थळावर होते. दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. प्रवरा परिसरातील गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून एक गाव एक गणपती असा उपक्रम आणि लोकसहभागातून प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पध्दतीने घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. यासाठी आ. विखे यांनी गावपातळीवर प्रमुख कार्यकर्ते आणि मंडळांना पत्र पाठवून आवाहन केले होते.त्यानुसार लोणी आणि पंचक्रोशीतील गावांसह शिर्डी आणि राहाता येथेही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदा गणेश ोत्सव साधेपणाने घरगुती साजरा करण्याचा निर्णय घेतला.

आ. राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्याहस्ते प्रवरा उद्योग समुहाच्या गणेशाची स्थापना साध्या पध्दतीने करण्यात आली. याप्रसंगी खा. डॉ. सुजय विखे पाटील, व्हा. चेअरमन विश्वासराव कडू, कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी, कामगार उपस्थित होते.

करोना संकटाने अडचणीत आलेल्या समाजातील घटकांना पुन्हा नवी उमेद देऊन सुख समृध्दी नांदावी म्हणून गणेशाला आपण साकडे घातले असल्याचे सांगतानाच लोकांची श्रध्दास्थान असलेली मंदीरे उघडण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय करण्याची मागणी करतानाच, तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेले व्यवसाय पाच महिन्यांपासून बंद असल्याने अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकांचे अर्थचक्र पुन्हा सुरळीत होण्यासाठी सरकारने याबाबत विचार करण्याची गरज आ. विखे पाटील यांनी बोलून दाखविली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com