अखेर प्रवरा नदीत कोसळलेले वाहन पाण्याबाहेर

एक बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला || टीडीआरएफच्या जवानांना यश
अखेर प्रवरा नदीत कोसळलेले वाहन पाण्याबाहेर

जोर्वे |वार्ताहर| Jorve

मालवाहतूक करणारी पिक अप जीप प्रवरा नदीपात्रात कोसळून वाहून गेल्याची घटना घडल्यानंतर तब्बल तिसर्‍या दिवशी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही पिकअप जीप पाण्याबाहेर काढण्यात ठाणे महानगरपालिकेच्या टीडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. तर पाण्यात बुडून मयत झालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह मिळून आला आहे. तर एक बेपत्ता आहे.

प्रकाश किसन सदावर्ते (रा. शेवली) याचा मृतदेह आढळला असून सुभाष आनंदराव खंदारे (रा. शेवली, जिल्हा जालना) हा वाहून गेला आहे.

संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीवरील पिंपरणे-जोर्वे पुलावरून सोमवार दि. 15 ऑगस्ट रोजीच्या रात्री 9 वाजता मालवाहतूक करणारी पिक अप जीप तिघांसह कोसळली होती. यामध्ये अमोल अरुण खंदारे याचा जीव वाचला होता. तर दोघे वाहनासह वाहून गेले होते. मंगळवारी क्रेन व गोताखोरांच्या सहाय्याने त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. अखेर मंगळवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास पिकअप जीप पाण्याखालीच असल्याची खात्री झाली. त्यानंतर दिवसभर प्रयत्नांची पराकाष्टा करून देखील नदीपात्रातून वाहन काढण्यात यश मिळाले नाही. त्यातच पाण्याचा प्रवाह प्रचंड होता.

प्रवरा नदीपात्रात भंडारदरा व निळवंडे धरणातून सुमारे 18 ते 20 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलेले होते. त्यामुळे पाण्याचा प्रचंड वेग असल्याने वाहन पाण्याबाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. जोर्वेचे उपसरपंच गोकुळ दिघे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना घटनेची गांभीर्यता भ्रमणध्वनीवरून दिली. त्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षप्रमुख मंगेश चिवटे विशेष कार्यकारी अधिकारी यांनी ठाणे महानगर पालिकेला पत्राद्वारे कळविले की, संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या जोर्वे, संगमनेर या पुलावरून पिकअप जीप नदीच्या पाण्यात कोसळून दोन इसम बेपत्ता झालेले आहेत.

त्यासाठी ठाणे महानगर पालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष ठाणे महानगरपालिका यांच्याकडे सहाय्यता मदतीसाठी मागणी करण्यात आली असता ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानुसार सचिन डुबे, शांताराम कोकणे, किशोर भोसले, संदेश घोडे, प्रतिक पाटील, नरेंद्र सावंत यांचे पथक साधन सामुग्रीसह संगमनेरकडे रवाना झाले.

दुपारी हे पथक संगमनेर येथे घटनास्थळी पोहचले. परिस्थितीचा अंदाज घेत पथकातील जवानांनी शोधकार्य सुरू केले. पथकातील जवानांनी अंडरवॉटर टेलीस्कोपी कॅमेर्‍यातून पिकअप जीप पाण्याखाली शोधली. अखेर पोकलेनच्या सहाय्याने पिकअप जीप पाण्याबाहेर काढण्यात आली. या पिकअप जीपमध्ये दोघांपैकी एकाचा मृतदेह आढळून आला आहे तर एक बेपत्ता झाला आहे.

आपत्ती व्यवस्थापन केवळ नावाला ?

आपत्ती व्यवस्थापन हे अडचणीच्या काळात सज्ज असावे लागते. पावसाळ्यात प्रवरा नदीला प्रचंड पाणी येते. याचा अंदाज घेत आपत्ती व्यवस्थापन सतर्क हवे, मात्र याबाबत जिल्ह्यासह संगमनेरचे आपत्ती व्यवस्थापन निष्काळजी दिसून येत होते. कुठलीही यंत्रणा स्थानिक प्रशासनाकडून उपलब्ध न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी लोकवर्गणी करुन क्रेन व फोकलेन आणण्याचा निर्णय घेत सहकार्य केले. मात्र प्रशासनाकडून कुठलीही मदत होत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com