
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील चिंचोली परिसरात प्रवरा नदीपात्रात स्मशानभूमीलगत एक वाळू उपसा करणारी बोट गेल्या पंधरा दिवसांपासून बेवारस स्थितीत पडून आहे. दिवसा ही बोट किनार्याला तर रात्री याच बोटीच्या सहाय्याने वाळू तस्करांकडून खुलेआम बेकायदा वाळू उपसा करण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही बोट कोणाची? वाळू तस्करी कोणाच्या आशिर्वादाने चालते? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ही बोट तातडीने जप्त करावी, अन्यथा ही बोट उद्ध्वस्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चिंचोली परिसरातील प्रवरा नदीपात्रातून रात्री-अपरात्री बोट आणि दोन पोकलेनच्या सहाय्याने बेकायदा खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. महसूलचा कोणताही परवाना नाही, कोणतीही रॉयल्टी भरली जात नाही. नदीपात्रातील वाळूचा अद्यापही लिलाव झालेला नाही. मात्र, येथून सर्रास वाळू उपसा होत असल्याने संबंधित अधिकारी संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत. येथील वाळू तस्करीला गावकर्यांचा विरोध असूनही त्यांच्या विरोधाला न जुमानता व याबाबत महसूलकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करून सर्रास होणार्या या बेकायदा वाळू उपशाला पायबंद घालण्याची मागणी होत आहे.
वाळू उपशाबाबत अनेकदा तक्रार केली असता राहुरीच्या महसूल पथकाने त्याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. तर संबंधित वाळू तस्करांवर कारवाईही झाली नाही. वाळू तस्करांचे संबंधित अधिकार्यांबरोबर थेट वरपयर्ंंत आर्थिक संबंध प्रस्थापित झाले असल्याची चर्चा होत आहे. एकीकडे राहुरी तालुक्यातील मुळा व प्रवरा नदीकाठच्या गावांनी अधिकृत वाळू लिलावाला ग्रामसभेत कडाडून विरोध केला असताना प्रवरा नदीपात्रात मात्र, बेफामपणे वाळूतस्करी सुरू आहे.
राहुरी तालुक्यात बर्याच वर्षांपासून मुळा व प्रवरा नदीपात्रातून खुलेआम वाळू तस्करी सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याही वाळू तस्कराने वाळू उपशासाठी बोटीचा वापर केला नव्हता. मात्र, प्रवरा नदीपात्रात सर्रास बोटीच्या सहाय्याने वाळूचा बेकायदा उपसा होत आहे. चिंचोलीच्या प्रवरा नदीपात्रातून एवढी महातस्करी होत असूनही याबाबत संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. रात्री बोट पाण्यात तर दिवसा काठावर ठेवा, असा सल्ला काही अधिकार्यांनी दिला असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे प्रवरा नदीपात्रात बोटीच्या लपवाछपवीचा खेळ चांगलाच रंगतो आहे.