
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील मुळा व प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळूउपसा केला जात आहे. प्रवरा नदीपात्रातून आधुनिक सामग्रीचा वापर वाळू उपसा करण्यासाठी केला जात आहे. काही गावातील प्रवरा नदीपात्रातून फरांडीच्या साह्याने वाळू उपसा केला जात आहेे. संगमनेरच्या महसूल व पोलिस प्रशासनातील अधिकार्यांचे मात्र या वाळू उपशाकडे दुर्लक्ष होत असल्याने वाळूउपसा करणार्यांचे चांगलेच फावले आहे.
संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीपात्रातील वाळूूूला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यामुळे या नदीपात्रातून नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला जातो. अधिकृत लिलाव झालेला नसतानाही अनेक जण नदी पात्रातून वाळूची वाहतूक करतात. यातून त्यांना मोठा आर्थिक लाभ होताना दिसत आहे. वाळूतस्कर यासोबत असलेल्या आर्थिक लागेबांधे मुळेच त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात नाही असा आरोप संबंधित गावातील ग्रामस्थांमधून केला जात आहे.
तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक, मंगळापूर, निंबाळे, वाघापूर, रायते या नदीपात्रालगतच्या गावांमधून अनेक जण खुलेआम वाळूची वाहतूक करत प्रवरा नदीला पाणी असतानाही त्यांनी वाळू उपसा बंद केलेला नाही. यासाठी फरांडीचा वापर केला जात आहे. यामुळे एकाच वेळी सुमारे अर्धा ब्रास वाळूचा उपसा करणे शक्य होते. संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातून दररोज अनेक वाहनांमधून वाळूची वाहतूक केली जात आहे.
वाळूचा खुलेआम बेकायदेशीर उपसा केला जात असतानाही महसूल खात्याचे कर्मचारी व अधिकारी यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे तालुक्यात वाळूतस्करांची मोठ्या प्रमाणावर अरेरावी वाढलेली आहे. महसूल अधिकार्यांनी तालुक्यातील बेकायदेशीर वाळू उपसा विरोधात त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी संबंधित गावातील ग्रामस्थांमधूूून होऊ लागली आहे.
खुलेआम वाळू साठा करूनही महसूल अधिकारी संबंधितावर कारवाई करताना दिसत नाही. या वाळू तस्करांना कोणाचा वरदहस्त आहे. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. महसूल प्रशासनाने संबंधित व्यक्तीविरुद्ध त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.