
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
येथील प्रवरा नदीपात्रामध्ये दररोज कोंबड्यांची पिसे, विष्टा आणून टाकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संगमनेर शहरातील चिकन विक्रेते कापलेल्या कोंबड्यांची पखाडे, पाय, मुंडके आतडी, विष्टा ही सर्व घाण दररोज संध्याकाळी अंधार पडल्यावर प्रवरानदीच्या पुलावरून अंधाराचा फायदा घेत पाण्यात टाकून देत आहेत. त्यामुळे वाहत्या पाण्यात टाकलेल्या घाणीमुळे खालच्या परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या नदीच्याकडेला संगमनेर खुर्द, सुकेवाडी, खांजापूर, वाघापूर, रायते, निंबाळे, रहिमपूर, जोर्वे आदी गावे आहेत. त्याचबरोबर वरील गावांना पाणीपुरवठा करणार्या योजनांच्या विहिरीही नदीपात्रात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यातून आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याकडे कुणीच लक्ष देत नाही. यावर खर्या अर्थाने संगमनेर नगरपालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही.
नगरपालिकेच्यावतीने संबंधित दुकानदारांना नोटीस बजावून त्यांच्याकडून संबंधित कचर्याची विल्हेवाट कशी लावता येईल याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.
दरम्यान याच भागातील निवडून येणारे नगरसेवक यांनी देखील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जो कुणी दुकानदार अशा पद्धतीने नदीपात्रात घाण आणून टाकत असेल तर त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रवरानदी पात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाणीही सोडले जात आहे. त्यामुळे प्रवरानदी ही गटारगंगा बनली असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
प्रवरा नदीपात्रात असे जर कोणी कोंबड्यांच्या मांसाचे तुकडे अथवा विष्ठा टाकताना आढळल्यास आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू तसेच सर्व चिकन व मटण विक्रेत्यांनी नगरपालिकेच्यावतीने जी घंटागाडी सुरू केलेली आहे, त्याच गाडीमध्ये त्यांनी वेस्टेज मटेरियल टाकावे अन्यथा इतरत्र टाकताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिला आहे.