प्रवरा नदीला छोटा पूर, मुळाही दुथडी

विसर्ग (मिमीमध्ये) - भंडारदरा 11325, निळवंडे 16718, गोदावरी 36731, मुळा 10000
File Photo
File Photo

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा पाणलोटातही पावसाचा जोर वाढल्याने अखेर काल मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास 11039 दलघफू क्षमतेचे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यानंतरही पाऊस सुरूच असल्याने या धरणातून सायंकाळी 10219 क्युसेकने पाणी वाढविण्यात आले. तर निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात 16718 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रवरा नदीला अकोलेत छोटा पूर आला आहे. पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

हरिश्चंद्र गड, आंबित यासह पाणलोटात जोरदार पाऊस कोसळत असल्याने मुळा नदीतील पाणीही वाढत आहे. नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेले मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरू असल्याने 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा 25071 (96.42टक्के) कायम ठेवून 8000 क्युसेकने पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावत आहे. कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग 8028 क्युसेक आहे. रात्री 9 वाजता विसर्ग वाढवून तो 10000 क्युसेक करण्यात आला.

भंडारदरा पाणलोटात गत आठ दिवसांपासून जोरदार पाणी कोसळत आहे. पाणलोटात जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. वातावरणात कमालीचा गारवा आहे. भंडारदरात दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 63 मिमी झाली आहे.

भंडारदरातून सोडण्यात येणारा विसर्ग, कृष्णवंती नदी व इतर ओढे-नाल्याचे पाणी निळवंडेत जमा होत असल्याने या धरणातही जोरदार आवक होत आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 7478 दलघफू कायम ठेवून 16718 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक वाढल्याने रात्री आठ वाजता भंडारदरातून 11325 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते.

त्यामुळे अकोलेतील प्रवरा नदीला छोट्या पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाणलोटात जोरदार पाऊस होत असल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून त्वरीत नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, अगस्ती साखर कारखाना चे संचालक मीनानाथ पांडे, शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, भानुदास तिकांडे, धरण शाखाधिकारी अभिजित देशमुख, योगेश जोर्वेकर, ईश्वर वाकचौरे, शेंडी गावचे सरपंच दिलीप भांगरे, विठ्ठल बापू खाडे, आनंदराव खाडे, बाबुराव असवले, भिमाशंकर कवडे यांच्या सह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. लाभधारकांसह आमच्या आदिवासी शेतकरी बांधवाची शेतीवाडी सुजलाम् सुफलाम् होवु दे. अशी प्रार्थना केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com