प्रवरा नदीपात्रात प्रेमीयुगुलाची कुटुंबाकडून यथेच्छ धुलाई

प्रवरा नदीपात्रात प्रेमीयुगुलाची कुटुंबाकडून यथेच्छ धुलाई

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

प्रवरा नदीपात्रात रात्री दोनच्या सुमारास अंधार्‍या रात्री प्रेमीयुगुलांची तरुणीच्या कुटुंबाने यथेच्छ धुलाई केली. दरम्यान, कुटुंबाने त्या तरुणीला घरी घेऊन गेल्यानंतर तरुणाने नदीपात्रातील विहिरीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथेच वाळू उपसा करणार्‍या तस्करांनी त्या तरुणाला आत्महत्येपासून परावृत्त करून त्याच्या घरी पाठवून दिले. ही घटना राहुरी तालुक्याच्या उत्तरेकडील प्रवरा नदीकाठच्या गावात घडली. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

संगमनेर तालुक्यातील एक तरुण आणि राहुरी तालुक्यातील एक तरुणी यांचे विद्यार्थीदशेतच सूत जमलेले होते. त्यांनी नदीपात्रात भेटण्यासाठी फोनाफोनी केली. ठरल्या वेळेप्रमाणे त्यांची नदीपात्रात भेट झाली. त्याचवेळी त्या तरुणीच्या कुटुंबाला या प्रकरणाचा कानोसा लागला. त्यांनी तातडीने नदीपात्र गाठले. त्या दोघांचीही बेदम धुलाई करून ते तरुणीला घरी घेऊन गेले. याचवेळी नदीपात्रातील गोंगाटाने एव्हाना सारा गाव जागा झाला होता. नदीकिनारी बघ्यांची मोठी जत्राच भरली होती.

दरम्यान, हताश झालेल्या त्या तरुणाने जवळच्याच विहिरीत आत्महत्या करण्यासाठी आपला मोर्चा वळविला. त्याचवेळी वाळूतस्करी करताना नदीपात्रातील तमाशा लांबून पाहणार्‍या तस्करांनी त्या तरुणाचे प्रबोधन केले. नंतर त्याला त्याच्या घरचा रस्ता दाखविला. या घटनेची जोरदार खमंगपणे चर्चा सुरू आहे.

Related Stories

No stories found.