प्रवरा परिसरात पावसाची जोरदार हजेरी

प्रवरा परिसरात पावसाची जोरदार हजेरी

लोहगाव |वार्ताहर| Lohgav

गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आता मान्सून येणार! आत्ता पाऊस पडणार! असे वेधशाळेचे अंदाज ऐकून ऐकून शेतकरी बेजार झाले होते. सर्वजण चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. अखेर काल सायंकाळी प्रवरा परिसरात गडगडासह जोरदार हजेरी लावली व या भागातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी आकाशात काळेभोर ढग जमा झाले.

राहाता तालुक्यातील लोहगाव, प्रवरानगर परिसरातील शेतकर्‍यांचे लक्ष आकाशाकडे होते. तीन आठवडे होत आले मात्र जोरदार पाऊस या भागात झाला नाही. काल शनिवारी सायंकाळी प्रवरानगर परिसरात चांगला जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याचा आनंद शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. असेच पाऊस पुढे एक-दोन झाले तर नक्कीच पेरणी करता येतील. शेतकर्‍यांचे जीवन हे पावसावर असते. पाऊस पडला तरच शेतात पिके उभी राहतात. विहिरी, बोरवेल यांना पाणी येते.

धरणांमध्ये पाणीसाठा वाढून कालव्याद्वारे, नदीद्वारे, चारी याद्वारेपाणी इथपर्यंत येऊन शेतकर्‍यांना पाणी मिळते. त्यामुळे सर्व जण चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. अखेर काल संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाच्या हजेरीमुळे शेतकर्‍यांचे काहीसे समाधान झाल्याचे दिसून येत आहे. मात्र एवढ्या पावसावर भागणार नसून अजून दोन-चार चांगले जोरदार पाऊस होण्याची गरज असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. मात्र काही का होईना पावसाला सुरुवात झाल्याचे समाधान शेतकर्‍यांमधून दिसून येत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com