प्रवरा डावा कॅनॉल जवळील रोडवर दिसला वाघ !

File Photo
File Photo

राजुरी |वार्ताहर| Rajuri

राजुरी गावाजवळून जाणार्‍या प्रवरा डावा कॅनॉलच्या जवळून जाणार्‍या रोडवर बुधवारी रात्री सात वाजण्याच्या

सुमारास शेतकरी सोमनाथ गोरे घरी जात असताना त्यांना पट्ट्याचा वाघ आडवा गेल्यामुळे घबराट निर्माण झाली. याची माहिती कळताच या भागात राहणार्‍या शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोमनाथ गोरे हे बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना समोरच मोटरसायकलच्या लाईटमध्ये रोड क्रॉस करताना पट्ट्याचा मोठा वाघ दिसताच त्यांनी मोटर सायकलचे ब्रेक दाबून गाडी थांबवली परंतु प्रसंगावधान राखून त्यांनी तो वाघ रोडच्या कडेला जाईपर्यंत त्याच्या दिशेने मोटरसायकलचा लाईट लावून धरल्यामुळे ते बालंबाल बचावले.

मंगळवारी ममदापूर येथील एका वयोवृद्ध शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केल्याची ताजी घटना घडली असतानाच राजुरी येथील गोरे यांना वाघ आडवा गेल्यामुळे या भागातील शेतकरी, शेतमजूर, ग्रामस्थ यांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

या बिबट्यांचा व दिसलेल्या वाघाचा बंदोबस्त वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी करावा व या भागात लवकरात लवकर पिंजरे लावावेत, अशी मागणी या भागातील शेतकरी व हृदय सम्राट सेनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ गोरे, राजुरी सोसायटीचे चेअरमन अशोक गोरे, व्हाईस चेअरमन डॉ.सोमनाथ गोरे, सरपंच सुरेश कसाब, दादासाहेब गोरे, बाबासाहेब भालेराव, गोपीनाथ भालेराव, अशोक भालेराव, नानासाहेब आहेर, कमलेश आहेर, विष्णू खर्डे, जालिंदर बेंद्रे राजेंद्र बोडखे, भाऊसाहेब भालेराव रघुनाथ बेंद्रे, भाऊसाहेब गोरे, शिवा गोरे आदींसह या भागातील शेतकरी शेतमजूर यांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राजुरी, ममदापूर, नांदूर, यादवमळा, तांबेवाडी, गोल्हारवाडी, वाकडी परिसर, निर्मळ पिंपरी, अस्तगाव आदी भागांमध्ये अनेक मोठे व छोटे बिबटे हे अनेक शेतकरी व शेतमजूर यांना दिसले. आता तर चक्क या परिसरामध्ये पट्ट्याचा वाघ असल्याचे लोक बोलत असून त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याविषयीची माहिती वन अधिकारी व कर्मचार्‍यांनाही देण्यात आलेली असून वन अधिकारी यांनी यात लक्ष घालून या बिबट्यांना व वाघाला पकडण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होऊ लागली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com