प्रवरेत वाहून गेलेला कोल्हेवाडीच्या तरुणाचा मृतदेह सापडला

प्रवरेत वाहून गेलेला कोल्हेवाडीच्या तरुणाचा मृतदेह सापडला

जोर्वे |वार्ताहर| Jorve

प्रवरा नदीपात्रावरील संगमनेर येथील जुन्या छोट्या पुलावरून वाहून गेलेल्या दोन तरुणांपैकी एकाला वाचविण्यात यश आले होते.

मात्र कोल्हेवाडी येथील तरुण वाहून गेला होता. काल सकाळी त्याचा मृतदेह वाघापूर शिवारात नदीपात्राच्याकडेला पाण्यावर तरंगताना आढळून आला.

शरद धोंडिबा कोल्हे (रा. कोल्हेवाडी, ता, संगमनेर) असे तरुणाचे नाव आहे. शरद धोंडिबा कोल्हे व सुनील चांगदेव आहेर हे दोन तरुण मोटारसायकलवरून संगमनेर खुर्द येथील मोठ्या पुलाजवळील असलेला छोटा पूल पार करताना नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही पात्रात वाहून गेले.

मात्र त्यातील सुनील आहेर हा तरुण मोठ्या पुलाजवळ वाहून जाताना काही तरुणांना दिसल्याने त्याला तेथे असलेल्या काही तरुणांनी त्वरित नदीपात्रात उड्या मारून सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. पण दुसरा कोल्हे नामक तरुण नदीपात्रात पुराच्या वाहत्या पाण्यात वाहून गेला.

या तरुणाचा रविवार दिनांक 23 पासून त्याचे नातेवाईक व कोल्हेवाडी येथील ग्रामस्थ शोध घेत होते. त्याचा मृतदेह मिळून येत नसल्याने नातेवाईक व ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला होता. महसूल विभागाला विनंती केल्यानंतर संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या सुचनेवरून कोपरगाव येथून बोट बोलवण्यात आली.

कोल्हेवाडीचे तलाठी बाजीराव गडदे, संजय कोल्हे यांसह पट्टीच्या पोहणारांनी देखील निंबाळे, वाघापूर, खराडी, जोर्वे परिसरात प्रवरा नदीच्या दुतर्फा या तरुणाचा शोध घेतला पण तो मिळून आला नाही. अखेर काल सकाळी वाघापूर शिवारात पुणे बायपास रोडवर असलेल्या प्रवरा नदीपात्रावरील पुलाच्या खालच्या बाजूने त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्याचा मृतदेह नदीच्या बाजूला घेऊन त्या जागेवरच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com