प्रवरा बँकेने शेतमाल तारण योजना सुरू करावी

ना. राधाकृष्ण विखे || सोनेतारण कर्जवाटप वाढविण्याचीही सूचना
प्रवरा बँकेने शेतमाल तारण योजना सुरू करावी

लोणी |वार्ताहर| Loni

ग्रामीण भागात काम करणार्‍या प्रवरा बँकेने शेतमाल तारण योजना सुरू करून शेतकर्‍यांना आधार द्यावा, असे सांगताना सोनेतारण कर्जवाटपाचे 200 कोटींचे ध्येय ठेऊन नियोजन करावे, अशा महत्त्वपूर्ण सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या.

प्रवरानगर येथील कामगार सांस्कृतिक भवनात प्रवरा सहकारी बँकेच्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष अशोक म्हसे होते. सभेला जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, बँकेचे उपाध्यक्ष बापूसाहेब वडितके, शांतीनाथ आहेर, बाळासाहेब भवर, कैलास तांबे, कारखान्याचे आर्थिक सल्लागार जिमी, डॉ. एस. आर. वाळुंज, बँकेचे सल्लागार नानासाहेब डोईफोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौरभ बलोटे, वसुली अधिकारी डॉ. एस. एच. वाडीले, गणेश विखे, पी. सी. डोंगरे, ए. एस. कडू, ए. बी. जेजुरकर, एस. एम. आभाळे, ए. एन. माघाडे, आर. एस. असावा, के. एस. कानडे, ए. बी. डहाळे आदी उपस्थित होते.

ना. विखे म्हणाले, 6 लाखांच्या ठेवींवर सुरू झालेल्या प्रवरा बँकेच्या आता 700 कोटींच्या ठेवी आहेत. खेळते भांडवल, स्वनिधी, गुंतवणूक, कर्जवाटप यामध्ये मोठी वाढ झाली आहे. कर्ज वसुलीचे प्रमाण समाधानकारक आहे. सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आहे. मात्र राज्य सरकारचे कायदे आणि नियम नागरी बँकांना अडचणीचे ठरत आहेत. त्याला कंटाळून आता पतसंस्थांच्या मल्टिस्टेट सोसायट्या सुरू केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षात राज्य सरकारने राजकीय हेतूने अनेक संस्थांवर कारवाया केल्या. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सरकार लवकरच नागरी बँका आणि सहकारी संस्थांसाठी पूरक धोरण घेणार आहे. स्पर्धेच्या युगात काहींना मोकळीक आणि काहींना जाचक नियम ही भूमिका आता बदलणार आहे.

ते म्हणाले, लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ही बँक स्थापन केली. कॅप्टन विजयराव गुणे यांनी 26 वर्षे तिचे अध्यक्षपद भूषविले. बँकेने बुलढाणा अर्बन बँकेप्रमाणे शेतमाल तारण योजना सुरू करावी. शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात मदतही होईल आणि शेतमाल योग्य भाव येताच त्यांना विक्रीही करता येईल. यासाठी ज्या पायाभूत सुविधा लागतील त्या बँकेने उपलब्ध कराव्यात. बँकेच्या संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी 28 टक्क्यांवर पोहोचलेला एनपीए 2.5 टक्क्यांपर्यंत आणल्याबद्दल त्यांचे कौतुकही ना. विखे यांनी केले.

अण्णासाहेब म्हस्के म्हणाले, बँकेने एकरकमी कर्जफेड योजना अधिक सक्षमपणे राबवावी. अधिक नफा मिळविताना उत्तम व तत्पर सेवा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. इतर बँकांमार्फत दिल्या जाणार्‍या नवनवीन सेवा-सुविधांचा अभ्यास करून त्या ग्राहकांना देण्याच्यादृष्टीने काम करावे. प्रारंभी अशोक असावा यांनी स्वागत केले. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com