पिकांचे पंचनामे करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्या
सार्वमत

पिकांचे पंचनामे करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्या

माजी खा. प्रसाद तनपुरेंची पालकमंत्र्यांकडे मागणी

Arvind Arkhade

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

पावसाळा सुरू होऊन 2 महिने झाले असून अजून 2 महिने पावसाळ्याचे शिल्लक आहेत. गेल्या 2 महिन्यांतच जिल्ह्यात 130 टक्केपेक्षा जास्त पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे तसेच लॉकडाऊनमुळे शेतीमाल, फळांच्या बागा, चारा पिके यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शासनाने शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तनपुरे यांनी म्हटले, यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन 2 महिने झाले आहेत. अजून 2 महिने पावसाचे शिल्लक आहेत. परंतु आजच्या तारखेपर्यंत जिल्ह्यात 130 टक्क्यांपेक्षाही अधिक पाऊस झाला असून काही मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. रोज जिल्ह्यात कुठेना कुठे कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे.

जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या शेतात उभ्या असलेल्या कपाशी, सोयाबीन, बाजरी, मूग, घास या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावेळी वेळेवर पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पिकांची पेरणी, लागवड केली असून अतिवृष्टीमुळे तर काही भागात अती पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे अतिशय नुकसान झाले आहे.तर काही ठिकाणी पिके नष्ट झाली आहेत.

तसेच जास्तीच्या पावसाने डाळिंब फळाचेही नुकसान झाले आहे. त्यातच करोनाच्या महामारीत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकर्‍यांच्या शेतमालाचे, फळांचे तसेच चारापिकांचे भाव कोसळले आहेत. शेतकर्‍यांच्या या सर्व पिकांचे अती पाऊस अतिवृष्टीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने जिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देण्याविषयी शासन स्तरावर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी तनपुरे यांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com