श्रीरामपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकातच

पालिकेला विशेष सभा बोलवावीच लागणार - प्रकाश चित्ते
श्रीरामपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकातच

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

छत्रपतीं शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकात या विषयाची विशेष सर्वसाधारण सभेची मागणी कायम असून या विषयावर विशेष सभा पालिकेला बोलवावीच लागणार असल्याचे श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीचे प्रकाश चित्ते यांनी म्हटले आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकातच या विषयावर नगरपालिकेने प्रत्यक्ष सभागृहातील स्वतंत्र विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी अशी मागणी 24 नगरसेवकांनी आपल्या सह्यानिशी नगरपालिकेकडे केली होती. अशी मागणी केल्यापासून 15 दिवसाच्या आत पालिकेने अशी विशेष सर्वसाधारण सभा बोलावणे कायदेशीरदृष्ट्या अपेक्षित होते मात्र असे न करता नगराध्यक्षांनी छत्रपतींच्या पुतळ्याच्या विषयाचा समावेश 12 जुलै रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत केला. हा छत्रपतींच्या श्रीरामपुरातील स्मारकाच्या पवित्र विषयाचा खेळ नगराध्यक्षांनी चालविला आहे. छत्रपतींच्या पूतळ्याच्या विषयाबद्दलची अनास्था दाखवून शिवप्रेमींच्या भावनांची हेटाळणी करून नगराध्यक्ष त्यांचा अपमान करीत आहेत. याचा आम्ही तिव्र निषेध करतो.

संसदेच्या दोन्ही सभागृहाने मंजूर केलेल्या सीएएच्या कायद्याचा श्रीरामपूर नगरपालिकेशी दुरान्वयानेही कुठलाही संबंध नसताना नगरपालिकेने या विषयावर चर्चा व मतदान करण्यासाठी प्रत्यक्ष सहभागृहातील विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली होती. मात्र छत्रपतींच्या श्री शिवाजी चौकातील अश्वारूढ पुतळ्याच्या विषयावर मात्र विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जात नाही. हा शुद्ध पोरखेळ चालला आहे, असा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चा कलम 81 नुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकातच या विषयावर नगरपालिकेने प्रत्यक्ष सभागृहातील स्वतंत्र विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी अशी मागणी 24 नगरसेवकांनी आपल्या सह्यानिशी नगरपालिकेकडे केली होती. कलम 81 नुसार अशी मागणी केल्या पासून 15 दिवसाच्या आत म्हणजे 6 जुलै पर्यंत नगरपालिकेने अशी विशेष सर्वसाधारण सभा बोलावणे कायदेशीर दृष्ट्या अपेक्षित होते मात्र असे न करता छत्रपतींच्या श्रीरामपुरातील स्मारकाच्या पवित्र विषयाचा खेळ नगराध्यक्षांनी चालविला आहे.

छत्रपतीं शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकात या विषयाची विशेष सर्वसाधारण सभेची मागणी कायम असून नगरपालिकेला अशी सभा बोलवावीच लागणार आहे असे श्रीछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रविण फरगडे, अरुण पाटील, मनसेचे बाबा शिंदे, नगरसेवक किरण लुणिया, संजय पांडे, राजेंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com