Maratha Andolan : सरकारला मस्ती आलीय, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; प्राजक्त तनपुरेंचा हल्लाबोल

Maratha Andolan : सरकारला मस्ती आलीय, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; प्राजक्त तनपुरेंचा हल्लाबोल

राहुरी | तालुका प्रतिनिधी

सरकारला सत्तेची मस्ती आली असून शिवरायांच्या राज्यात महिलांचे व तरूणांचे रक्त सांडवणार्‍या गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही, असा इशारा आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या आंदोलकांवर गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार लाठीमार करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून आज राहुरी येथील बाजार समितीसमोर मराठा समाजाच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर ‘चक्काजाम’ आंदोलन प्रसंगी ते बोलत होते. यावेेळी अनेक सामाजिक संघटनेने मराठा आंदोलनाला पाठिंबा देत घटनेचा निषेध व्यक्त केला. या चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मराठा समाजासह इतर समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या चक्काजाम आंदोलनात सहभागी होऊन निषेध व्यक्त केला.

आ. तनपुरे म्हणाले, सरकारने जालन्यात शांततेत सुरू असलेले आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला. शेजारच्या जिल्ह्यात होणार्‍या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमावर या आंदोलनाच परिणाम होऊ नये म्हणून हा पुर्वनियोजित कट होता. यावेळी प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले. आंदोलनास मराठा एकिकरण समितीचे समन्वयक देवेंद्र लांबे, शेतकरी संघटनेचे रविंद्र मोरे, शिवसनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख रावसाहेब खेवरे, तालुका प्रमुख सचीन म्हसे, रिपाईचे बाळासाहेब जाधव, राजेद्र खोजे, अनिल चत्तर, संतोष आघाव, पांडू उदावंत, अशोक तनपुरे, राजेंद्र लबडे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com