प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शिर्डी नगरपंचायतसमोर ढोल बजाओ आंदोलन

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शिर्डी नगरपंचायतसमोर ढोल बजाओ आंदोलन

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नगरपंचायतीच्यावतीने अतिक्रमण विरोधात सुरू केलेली छोटे-मोठे हातविक्री करणार्‍या विरोधातील कारवाई थांबविण्यात यावी व गोरगरिबांचे जमा केलेले साहित्य परत करण्याची विनंतीवजा मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने केली होती. मात्र त्यास प्रतिसाद न मिळाल्याने शिर्डी नगरपंचायतसमोर शहराध्यक्ष अमोल बानाईत यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाओ व ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्याशी यशस्वी चर्चा झाल्यानंतर ढोल बजाओ आंदोलन थांबवून ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

शिर्डी नगरपंचायतमार्फत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत गोरगरीब हातविक्रेते यांच्या विक्री साहित्याचे नुकसान केले जात आहे. अतिक्रमण हटाव पथकाने साहित्याचे नुकसान करण्याऐवजी त्यांना रितसर दंडात्मक कारवाई करण्यास आमचा विरोध नाही. परंतु गरिबांवर कारवाई केली जात असताना काहींना मात्र या कारवाईतून अभय दिले जाते हे खेदजनक आहे. गोरगरिबांचे साहित्य आठ दिवसांत त्यांना परत करण्याची विनंती प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शिर्डी शहराध्यक्ष अमोल बानाईत यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिली होती. परंतु याविषयी योग्य ती कारवाई न झाल्याने व साहित्य परत न मिळाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चुभाऊ कडू व प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. 3 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजेच्या सुमारास शिर्डी शहर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने अतिक्रमण कारवाईच्या विरोधात ढोल बजाओ व ठिय्या आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी शिर्डी शहराध्यक्ष अमोल बानाईत, कार्याध्यक्ष विकी मिसर बापूसाहेब पवार, शिर्डी शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब दिघोळे, राहुल थोरे, उपतालुकाध्यक्ष विजय काकडे, माजीदभाई पठाण, प्रतिक गायकवाड, रोहित पगारे, काकासाहेब उदावंत, सोमनाथ मुरादे, दीपक जाधव, गुड्डू आव्हाड, अरबाज शेख, शाहरुख शेख आदींसह मोठ्या प्रमाणावर महिला, पुरुष सहभागी झाले होते.

यावेळी नगरपंचायतच्या प्रवेशद्वारासमोर उपस्थित हातविक्रेते व फेरीवाल्यांनी ना. बच्चूभाऊ कडू यांच्या नावाचा जयघोष करत घोषणाबाजी करून एक तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात विशेष म्हणजे दिव्यांग बांधवांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

शिर्डी नगरपंचायतच्या वतीने शहरातील अतिक्रमणे हटविण्यात येत असून शहरात फुटपाथवर तसेच शासकीय जागेवर बसलेला अतिक्रमणधारक हा अतिक्रमणधारकच असतो. यामध्ये गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव होत नाही. शहरातील फुटपाथवरील हातविक्रेते यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन निर्णय घेणार आहे.

- काकासाहेब डोईफोडे, मुख्याधिकारी शिर्डी नगरपंचायत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com