आंदोलनाची दखल न घेतल्यास कायमस्वरूपी टोल बंद करणार

आंदोलनाची दखल न घेतल्यास कायमस्वरूपी टोल बंद करणार

प्रहारचा इशारा; खडका फाट्यावर टोलबंद आंदोलन

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गाच्या दयनीय अवस्थेविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खडका फाटा येथे टोल बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाद्वारे कुठल्याही गाडीचा टोल वसूल न करता ती गाडी सोडण्यात आली. टोलनाक्यावर पैसा जमा केला जातो, तो जनतेच्या सेवेसाठी असून जर जनतेच्या सेवेसाठी तो वापरला जाणार नसेल तर प्रहार जनशक्ती पक्ष कधीही सहन करणार नाही, अशी भूमिका पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी मांडली. आंदोलनाची दखल न घेतल्यास कायमस्वरूपी टोल बंद करणार ,असा इशाराही पोटे यांनी दिला.

नगर-औरंगाबाद महामार्गावर अपघातामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. याला जबाबदार असणारे अधिकारी मात्र, याकडे कानाडोळा करून संबंधित ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. ही कारवाई न केल्यास संबंधित अधिकार्‍यांवर निष्पापांचे बळी घेतले म्हणून गुन्हे दाखल करावे लागतील, अशी भूमिका या ठिकाणी प्रहार कडून मांडण्यात आली. आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांनी मागणी केली, नियमावलीनुसार किती दिवसात काम पूर्ण करणार आहोत? याचे लेखी द्यावे. परंतु ते लेखी देण्यासाठी अधिकारी तयार झाले नाही. त्याचबरोबर संबंधित ठेकेदाराचे म्हणणे होते, जे नियमात लिहिलेले आहे ते कामे पूर्ण करून देतो. यासाठी माझी जबाबदारी नसून अधिकारी सांगतील तसे काम मी करणार आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात कुठलाही समन्वय नसल्याने सामान्य नागरिकांची हेळसांड होत आहे.

प्रहारचे कायदेशीर सल्लागार पांडुरंग औताडे म्हणाले, जनसामान्यांना सुविधा देणार्‍या संबंधित ठेकेदाराची जबाबदारी असून त्यावर नियंत्रण करण्याचे काम शासकीय अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे. यावेळी टोलनाका स्थळावर दोन तास विनाटोल वाहने जाऊ देण्यात आली.चर्चेतून काही निष्पन्न न झाल्याने अधिकारी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना त्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून त्यांच्याकडून या सर्व बाबीचा जाब विचारायचा या निर्णयावर येऊन संबंधित आंदोलन स्थगित करण्यात आले.

जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले म्हणाले, सामान्य जनतेचा आवाज प्रहार असल्याने मला कुठलीही भीती बाळगायची गरज नाही. यावेळी प्रहारचे जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सांगळे, कार्याध्यक्ष अनिल विधाटे, युवा तालुकाध्यक्ष विकास कोतकर, तालुका संपर्कप्रमुख आदिनाथ नवले, तालुका संघटक सागर पाठक, शाखाध्यक्ष पांडुरंग नवले, गोरक्षनाथ आरगडे, अरविंद आरगडे, कृष्णा शेळके, राजेंद्र कळसकर, दत्तात्रय काशीद, विनोद फुगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला व समन्वयाची भूमिका घेतली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com