
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील 289 लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलासाठी पैसे देऊनही अद्याप बांधकाम सुरू केलेले नाही. ज्यांना घर बांधायचे असेल त्यांनी घराचे बांधकाम सुरू करावे अन्यथा शासनाचे पैसे तात्काळ परत करावेत.जे लाभार्थी घराचे बांधकाम सुरू करणार नाहीत अथवा पैसे परत करणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे यांनी दिली.
तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालवे बोलत होते. तालुक्यात 2016-17 ते 2020-21 या कालावधीत घरकुलाच्या लाभार्थ्यांना पंचायत समितीने घरकुल बांधण्यासाठीचा पहिल्या हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली होती. अनेक वेळा ग्रामसेवक, विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी संबधित लाभार्थ्यांना भेटून घराचे काम सुरू करा असे सांगितलेले आहे.
तसेच ज्यांना घराचे बांधकाम करावयाचे नाही त्यांनी शासनाचे पैसे तात्काळ परत करावेत, अशी मागणी केली आहे. गटविकास अधिकारी यांनी नोटिसा पाठवून कारवाई करण्याचे कळविलेले आहे. तरीही तालुक्यातील 289 लाभार्थ्यांनी अद्याप काहीच केलेले नाही.आता घराचे बांधकाम सुरू करा अन्यथा पैसे परत भरा. असे केले नाही तर पोलिसांत जाऊन फौजदारी स्वरुपाचे गुन्हे संबधितांच्या विरुद्ध दाखल करण्यात येतील असा इशारा गटविकास अधिकारी डॉ.पालवे यांनी दिला आहे.