दोन्ही गट तुमचेच मग निवडणुका कशाला ?- घोगरे

दोन्ही गट तुमचेच मग निवडणुका कशाला ?- घोगरे

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही गट तुमचेच होते तर मग निवडणुका कशाला घेतल्या. त्यामुळे प्रशासनावर अनावश्यक ताण येण्यासह तुमच्याच कार्यकर्त्यांमध्ये हेवेदावे लागले, त्यांचेच आर्थिक नुकसान झाले आहे. कारखाने, बँका, मार्केट कमिटी, मुळा-प्रवरेच्या निवडणुकांसारख्या या निवडणुका समन्वयातून बिनविरोध का झाल्या नाहीत, असा सवाल कृषीभूषण प्रभाताई घोगरे यांनी केला.

राहाता तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाबाबत त्या म्हणाल्या, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका पालकमंत्र्यांच्या दोन गटांत पार पाडल्या. जर राजकीय विरोधकच नाही तर पालकमंत्र्यांकडून आपल्याच कार्यकर्त्यांना दोन गटात लढवून अशा निवडणुका का केल्या जातात हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे गोरगरिबांची प्रशासकीय कामे सोडून शासकीय यंत्रणा दोन गटांतील निवडणूक घ्यायला उभी करावी लागते. पालकमंत्र्यांच्या कारखाने, बँका, मार्केट कमिटी, मुळा प्रवरा यासारख्या संस्थांच्या निवडणुका बिनविरोध केल्या जातात.

मग जर सर्व आपलेच कार्यकर्ते आहेत तर गावातल्या ग्रामपंचायत व सेवा संस्थेच्या निवडणुका कशासाठी लावल्या जातात. यामुळे गावातील निवडणुकीत आपला मोठेपणा दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांकडून आपल्या संसार प्रपंचाची होळी होते. वारेमाप पैसा उधळला जातो. अनेक तरुण याकाळात व्यसनाधिन होतात. पार्ट्यामुळे अनेक पशुंचा बळी जातो. या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांच्या घराघरांत भांडण लागते. सुख, दुःख, लग्नकार्य, अंत्यसंस्कार सारख्या बाबींमध्ये एकमेकांना मदत न करण्यापर्यंत हे राजकारण जाते.

युवकांनी सुध्दा समाजात जनजागृती केली पाहिजे. गावातल्या निवडणुका जर अशा एकाच नेत्याच्या दोन गटात होणार असेल तर आपण यापासून अलिप्त राहायला हवे. संघर्ष, पार्टी, व्यसन, वायफळ खर्च टाळला पाहिजे व कुटुंबाची हानी टाळली पाहिजे. पालकमंत्र्यानी स्वतःच्या निवडणुका प्रमाणेच पुढील टप्प्यातील किमान आपल्याच दोन गटांत निवडणूक घेण्याऐवजी त्या समन्वयातून बिनविरोध कराव्यात, असे मत प्रभाताई घोगरे यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com