
शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
शेती पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा यासाठी तहसील कार्यालयात शेतकरी तसेच ग्रामस्थांनी सुमारे एक तास ठिय्या आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदवला.
शेवगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्याने आहे ती पिके कशीबशी जगवण्याचा अटापीटा शेतकरी करत असताना अशात विजपुरवठा खंडीत होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. अनेक गावांचा शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत झालेला असून हा शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करावा यासाठी गहीले वस्ती, माळीवाडा, दादेगांव, खुंटेफळ या शिष्टमंडळाने शेवगाव तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
तालुक्यातील दादेगांव, खुंटेफळ, घोटण, तळणी या भागासह शेवगाव शहरातील माळीवाडा, खुंटेफळ रोड, गहीले वस्ती या भागाचा शेतीपंपाचा वीजपुरवठा गेल्या आठ दिवसापासून खंडीत झालेला आहे. यामुळे या परिसरातील शेतकर्यांची उभे पिके पाण्याअभावी जळण्याच्या अवस्थेत आहेत. अगोदरच पावसाने दडी मारल्याने हातातोडांशी आलेली ही पिके या खंडीत वीजपुरवठ्याने वाया जाणार असल्याने शेतकरी हवाल दिल झाला आहे. याचाच रोष व्यक्त करत आज परिसरातील शेतक-यांनी थेट तहसील कार्यालयात धडक देत तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या कार्यालयात सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी सुमारे शंभर ते दिडशे शेतकरी उपस्थित होते.