खंडित वीज पुरवठ्यामुळे पुणतांबेकर त्रस्त

वीज
वीज

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा व आजूबाजूच्या परिसरात अनेक दिवसांपासून सकाळी, दुपारी व संध्याकाळी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेकदा रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला होता. त्यामुळे गणेश मंडळांना कोणतेही सामाजिक कार्यक्रम किंवा जीवन कला सादर करता येत नाही. त्यामुळे सर्व गणेश मंडळांतील कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे.

पाऊस नसला तरी कोणतीही पूर्व सूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप हा सर्वसामान्यांना सूचना देण्याकरिता बंद करण्यात आलेला आहे. फक्त मुख्य व्यक्तीच व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करू शकते. त्यामुळे लघुउद्योजक, व्यापारी वर्ग, विद्यार्थी वर्ग, शेतकरी गृहिणी, या सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे हैराण झालेले आहेत. महावितरण कर्मचारी व अधिकारी वर्ग यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांकडून व शेतकरी वर्गाकडून होत आहे.

वादळी वार्‍याचा पाऊस झाल्यास वीजपुरवठा खंडित होणे साहजिक आहे. परंतु विनाकारण दररोज कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे महावितरणच्या अधिकारी वर्गावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही नागरिक स्वतःहून महावितरणाच्या ग्रुपमधून बाहेर पडलेले आहेत. सर्वसामान्य जनतेला वेठीस न धरता नियमित वीजपुरवठा द्यावा. वीजपुरवठा खंडित करावयाचा असल्यास पूर्वसूचना द्यावी. सर्व अधिकारी वर्गाने यात विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापारी, ग्रामस्थ शेतकरी यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com