सुपा (वार्ताहर) -

अनेक गावांतील रोहित्र बंद केल्याने हातातोंडाशी आलेली उभी पिके जळू लागली आहेत. विद्युत वितरण कंपनीने गेल्या काही दिवसांपासून

सुपा परिसरातील वीज बिलाची थकबाकी भरण्यासाठी रोहित्रच बंद केले आहेत. त्यामुळे शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. लाईट बिल भरल्याशिवाय विद्युत पुरवठा केला जाणार नाही, असे लाईनमन सांगत असून महाराष्ट्र वीज मंडळाच्या पठाणी वसुलीचा शेतकर्यांना मोठा फटका बसत आहे.

चालू वर्षी पाऊस पाणी चांगले असल्याने शेतकर्यांनी जास्त उत्पादन देणारी पिके शेतात घेतली आहेत. त्यांच्या या अपेक्षाही पूर्ण होताना दिसत होत्या. कारण कांदा चाळीस रुपये किलोने विकला जात असताना इकडे शेतकर्यांचे कांदा पीक शेवटच्या टप्प्यात असताना लाईट बंद केल्याने ऐन पीक वाढीच्या काळात पाण्यावाचून पिके जळू लागली आहेत. अशीच काहीशी अवस्था गहू, हरभरा या पिकांचीही आहे. तर भाजीपाला व फळ पिकांना या काळात जास्त पाण्याची गरज असताना लाईट सपलाय बंद असल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत.

उन्हाळी फळ पिके, कलिंगड, खरबूज, काकडी या पिकांना या वाढीच्या काळात दिवसाआड पाणी अपेक्षित असते; परंतु आठ दिवसांपासून लाईट नसल्याने ऐन भुकेच्या कालखंडात पिकांची अवस्था तडफडणार्या प्राण्याप्रमाणे झाली आहे. तर पाण्याअभावी हिरव्या चार्यावर परीणाम झाल्याने त्याचा परिणाम दूध उत्पादनावरही होत आहे.

एकीकडे मोठाल्या उद्योगांना मोठमोठ्या सवलती दिल्या जातात आणि जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाकडून मात्र पठाणी वसुली केली जात आहे. चालू घडीला थोडे बाजारभाव बरे असताना वीज मंडळ सक्तीच्या वसुलीसाठी आठ-आठ दिवस लाईट बंद करून शेतकर्यांच्या अन्नात माती कालवत आहे. म्हणजे कांद्याने तारले पण वीज मंडळाने मारले, असे म्हणण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.