वीज मीटरमध्ये छेडछाड करून 32 लाखांची वीजचोरी

आगडगावच्या कृष्णा स्टोन क्रशरमधील प्रकार : पोलिसांत गुन्हा
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आगडगाव (ता. नगर) येथील कृष्णा स्टोन क्रशर या खडी क्रशरच्या वीजजोडणीची महावितरणच्या भरारी पथकाने तपासणी केली असता वीज मीटरच्या मूळ जोडणीमध्ये छेडछाड करून गेल्या दोन वर्षांत एकूण दोन लाख 21 हजार 328 युनिटस्ची म्हणजे एकूण 32 लाख 54 हजार 940 रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता संदीप बराट यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दिलीप रंगनाथ गायकवाड (रा. आगडगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगडगाव येथील कृष्णा स्टोन क्रशर या खडी क्रशरच्या ठिकाणी थ्री फेज वीजजोडणी दिलेली असून सदर खडी क्रशरचे मालक दिलीप गायकवाड हे आहेत. सदर ठिकाणी तपासणीसाठी उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर व कनिष्ठ अभियंता संदीप बराट यांच्यासह महावितरणचे भरारी पथक गेले असता रोहित्रावरील वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड व फेरबदल करून या खडी क्रशरच्या ठिकाणी विजेची चोरी केल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आले.

यात गेल्या दोन वर्षांत एकूण दोन लाख 21 हजार 328 युनिट्सची म्हणजे एकूण 32 लाख 54 हजार 940 रूपयांची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. महावितरणच्या भरारी पथकाने खडी क्रशरच्या मालकाला नोटीस देऊन वीज चोरीची रक्कम 32 लाख 54 हजार 940 रुपये व तडजोडीची रक्कम 13 लाख 10 हजार अशी एकूण 45 लाख 64 हजार 940 रूपये जमा करण्यास सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत खडी क्रशरच्या मालकाने सदर रक्कम न भरल्याने खडी क्रशरचे मालक दिलीप गायकवाड याच्याविरूध्द भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com