वीज वितरणाच्या गलथान कारभारामुळे पुणतांबा कायम अंधारात - नितीन जोगदंड

वीज वितरणाच्या गलथान कारभारामुळे पुणतांबा कायम अंधारात - नितीन जोगदंड

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा गावाला निमगाव 33 केव्हीतून वीज पुरवठा करणार्‍या यंत्रणेत वारंवार बिघाड होत असून गावाला कायम अंधारात राहावे लागत आहे. विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे गावातील घरगुती व शेती पंपधारक वीज ग्राहक यांना वेठीस धरले जाते. शिवाय पुणतांबा ते निमगाव 33 केव्ही वीजपुरवठा करणार्‍या यंत्रणेचा बिघाड शोधण्यासाठी वीज वितरण कर्मचार्‍यांना रात्री अपरात्री पावसाळ्यात जीव धोक्यात घालून काम करावे लागते. यास वितरण कंपनीचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य नितीन जोगदंड यांनी केला आहे.

निमगाव येथून 33 केव्हीचा वीज पुरवठा करणारी यंत्रणा अनेक दशकांची असल्यामुळे जुनाट झालेल्या यंत्रणेमुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा केव्हाही बंद पडत आहे. यामुळे घरगुती व शेतीपंप ग्राहक यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. परंतु वीज वितरणाचे ग्राहकाकडील वीज बिल वसूल करताना हुकूमशाही सारखा वापर करण्यात येतो. बिल भरण्यास उशीर झाला तर तात्काळ वीजपुरवठा खंडित केला जातो. पुन्हा जोडणीसाठी फी आकारली जाते. वीज बिलासाठी शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी डिपी बंद करण्यात येते. इतकेच नाही तर एखादी डीपी जळाली तर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून आणण्याचा किंवा दुरुस्तीचा खर्च कृषी पंपधारक शेतकर्‍यांना करण्यास भाग पाडले जाते.

मागील आठवड्यात रास्तापूर शिवारात वसुलीसाठी कृषीपंप धारकांची डिपी बंद करण्यात आली. वसुलीसाठी जसा वरिष्ठ अधिकार्‍यांचा बडगा सांगितला जातो. कोपरगाव-पुणतांबा या राज्य मार्गालगत कोपरगाव येथून आलेली 33 केव्ही वीज पुरवठा करणारी वीज जोडणी शिंगवे येथे आलेली आहे. येथून पुणतांबा येथे वीज जोडणी घ्यावी. कारण हे अंतर फक्त 7 ते 8 किमी आहे, अशी मागणी तीन वर्षांपूर्वी सरपंच डॉ. धनंजय धनवटे व गणेशचे संचालक राजेंद्र थोरात यांनी केलेली आहे. या मागणीकडे कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. याचा परिणाम पुणतांबा गावातील वीज ग्राहकांना भोगावा लागत आहे. या प्रश्नावर जनतेसह मोठा राजकीय दबाव निर्माण करणे हाच मार्ग आहे, असे ग्रामपंचायत सदस्य नितीन जोगदंड यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com