
श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur
उपविभागीय दंडाधिकारी यांनी 2 महिन्यांच्या आत पोल्ट्री स्थलांतरीत करण्याचे आदेश देऊनही पोल्ट्री स्थलांतरीत न केल्याने कारेगाव येथील एका पोल्ट्री फार्म चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील रमेश मुकूंद चव्हाण यांचे शेती गट नं. 374 मध्ये पोल्ट्री फार्म आहे. या पोल्ट्री फार्मच्याजवळ राहणारे कानिफनाथ प्रल्हाद चव्हाण व त्यांच्या आसपास राहत असलेल्या कुटुंबियांना या पोल्ट्री फार्ममुळे त्रास होऊ लागल्याने त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. यासंबंधी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे तक्रार केली होती. तसेच उपविभागीय दंडाधिकारी, श्रीरामपूर यांच्या न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती.
सदर प्रकरणाची सर्व सुनावणी होऊन दि. 28 जून 2022 रोजी उपविभागीय दंडाधिकारी यांनी रमेश मुकूंद चव्हाण यांनी त्यांच्या मालकीच्या गट नं. 374 मधील पोल्ट्री फार्म दोन महिन्यांच्या आत दुसर्या ठिकाणी स्थलांतरीत करावे, नाहीतर दोन महिन्यांच्या आत ग्रामसेवक यांनी पोल्ट्री चालकाविरोधात नियमानुसार कारवाई करावी, असे आदेश दिले होते. असे आदेश असतानाही पोल्ट्री चालक रमेश चव्हाण यांनी पोल्ट्री फार्म आहे, त्याच जागेवर सुरू ठेवल्याने उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न करता आदेशाचा अवमान केला आहे.
याप्रकरणी कारेगावचे ग्रामसेवक राजू अण्णासाहेब भालदंड (वय 50) यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका- पोलिसांत रमेश मुकूंद चव्हाण यांच्याविरोधात भादंवि कलम 188, 268, 269, 270 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि. ज्ञानेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत.