कुक्कुटपालन कंपनीला 54 लाखांचा गंडा; एक गजाआड

नगर तालुका पोलिसांची कारवाई
कुक्कुटपालन कंपनीला 54 लाखांचा गंडा; एक गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अलिबाग (जि. रायगड) येथील एका कंपनीच्या 54 लाखांची फसवणूक प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आणखी एका आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. रंगनाथ हरिभाऊ भोर (वय 57 रा. भोरवाडी ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नगर तालुका पोलिसांनी कामरगाव (ता. नगर) येथून भोर याला ताब्यात घेत अटक केली आहे.

या गुन्ह्यातील दीपक रंगनाथ भोर, सुहास किसन महांडुळे (दोघे रा. भोरवाडी ता. नगर), महेश बबन भोर (रा. निमगाव वाघा ता. नगर) यांना यापूर्वीच अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत. अलिबाग येथील प्रिमीयम चीक फिड्स कंपनीची केडगाव येथे शाखा आहे. कंपनी पोल्ट्री चालक शेतकर्‍यांशी करार करून त्यांना बॉयलर कोंबड्यांची पिल्ले, खाद्य आणि औषधे देते.

शेतकरी ती पिल्ले वाढवतात व त्या मोबदल्यात त्यांना पिल्लांच्या वजनावरून पैसे दिले जातात. या व्यवसायाबाबत संबंधितांशी करार केले जातात. केडगाव शाखेकडून शेतकर्‍यास दिलेले पक्षी व खाद्य शेतकर्‍यांनी परस्पर विकलेले असल्याचे चौकशीतून समोर आले होते. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना आतापर्यंत अटक झाली आहे. उपनिरीक्षक चव्हाण यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इथापे, भालसिंग यांनी ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com