कुक्कुटपालन कंपनीला 54 लाखांचा गंडा

नगर तालुका पोलिसांत गुन्हा; 10 आरोपींचा समावेश
कुक्कुटपालन कंपनीला 54 लाखांचा गंडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतकर्‍यांनी कुक्कुटपालनसाठी कंपनीकडून आणलेल्या सुमारे साडेसोळा हजार पिल्लांची कंपनीच्या कर्मचार्‍यांशी संगनमत करून परस्पर विक्री केली. तसेच करारनाम्याच्या मूळ प्रतींची चोरी केली. या प्रकारात अलिबाग (जि. रायगड) येथील एका कंपनीची 54 लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात पोल्ट्री चालक व कंपनीतील कर्मचारी अशा 10 जणांविरोधात फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक भोर, शिवाजी गायकवाड (शाखा व्यवस्थापक), रोहन धांडे (लेखनिक), कृष्णा शिंदे (मार्केटिंग सहायक), रोहित शिंदे (लेखनिक सहायक), महेश भोर, सौरभ कापसे, अनिल मारूती गुंजाळ (पोल्ट्री फार्म मालक, रा. निमगाव वाघा ता. नगर), सुहास किसान महांडुळे (पोल्ट्री फार्म मालक, रा. भोरवाडी ता. नगर), रघुनाथ हरी भोर (पोल्ट्री फार्म मालक, रा. भोरवाडी, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

प्रिमीयम चीक फिड्स कंपनीचे लेखापरीक्षक संदेश हिराचंद दांडेकर (रा. मेढेखार, ता. अलिबाग, जि. रायगड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कंपनीची नगरमध्ये केडगाव येथे शाखा आहे. कंपनी परिसरातील पोल्ट्री चालक शेतकर्‍यांशी करार करून त्यांना बॉयलर कोंबड्यांची पिल्ले, खाद्य आणि औषधे देते. शेतकरी ती पिल्ले वाढवतात व त्या मोबदल्यात त्यांना पिल्लांच्या वजनावरून पैसे दिले जातात.

या व्यवसायबाबत संबंधितांशी करार केले जातात. केडगाव शाखेकडून अनिल गुंजाळ, सुहास महांडुळे, रघुनाथ भोर या शेतकर्‍यास दिलेले पक्षी व खाद्य शेतकर्‍यांनी परस्पर विकलेले असल्याचे केडगाव येथील शाखा व्यवस्थापक शिवाजी विश्वनाथ गायकवाड यांनी कंपनीचे मालक शाम भालचंद्र ढवण यांना कळविले. त्यानंतर ढवण यांनी दांडेकर यांना शाखेचे लेखा परीक्षण करण्यास व कर्मचार्‍यांकडे चौकशी करण्यास सांगितले.

8 एप्रिल रोजी दांडेकर व लेखा परीक्षक राजेश रमेश गुरव यांनी केडगाव शाखेचे लेखा परीक्षण केले. शाखेतील कर्मचार्‍यांकडे चौकशी केली. यात अनिल गुंजाळ, सुहास महांडुळे, रघुनाथ भोर, अर्जुन भोर या चार शेतकर्‍यांशी केलेल्या करार पत्राच्या मूळ प्रती शाखेत मिळाल्या नाहीत. शेतकर्‍यांचे फार्मवर देखरेख करण्याचे काम प्रदीप बबन खेडकर या लाईन सुपरवायझरकडे होते. त्याच्या फार्म बुक व इतर रेकॉर्डवरून शेतकर्‍यांकडे असलेले पक्षी व खाद्य हे त्यांनी विकले असल्याचे समोर आले. यातून कंपनीची 54 लाख 18 हजार 438 रुपयांची फसवणूक झाली.

Related Stories

No stories found.