पशु-कुक्कुट पक्षांमधील साथरोग नियंत्रणासाठी आता ‘टास्क फोर्स’

गायी, शेळी-कुक्कुटपालन व्यावसायिकांना दिलासा
पशु-कुक्कुट पक्षांमधील साथरोग नियंत्रणासाठी आता ‘टास्क फोर्स’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात पशु-कुक्कुट पक्षांमध्ये आढळून येणार्‍या विविध साथरोगांचे शास्त्रीय पध्दतीने व्यवस्थापन करून शेतकरी, गोपालक, कुक्कट व्यवसायिक यांचे कमीत कमी आर्थिक नुकसान होण्याच्या हेतूने कार्यदलाचे (टास्क फोर्स) गठन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

यासाठी राज्यस्तरीय, विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यदल स्थापन करण्यात येणार असून या टास्क फोर्सवर राज्यात पशु-कुक्कुट पक्षांमध्ये आढळून येणार्‍या विविध रोगांच्या साथीचे शास्त्रीय पध्दतीने नियंत्रण करणे, अशा रोगांनी बाधित पशुधन व कुक्कुट पक्षांवर योग्य उपचार सुचविणे, रोग प्रादूर्भावाबाबत आवश्यकतेनुसार शासनाच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिध्द करण्यासाठी शिफारस करणे. राज्यात प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गीक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 चे पालन करणे, साथरोग प्रादूर्भावा दरम्यान लससाठा व प्रतिबंधात्मक लसीकरणाचे व्यवस्थापन करणे, रोग प्रादूर्भावा दरम्यान आवश्यक औषधीसाठा सुनिश्चित असल्याची खात्री करणे, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने उपरोक्त सर्व बाबींची अंमलबजावणी करणे तसेच याबाबत वेळोवेळी अहवाल शासनास सादर करणे हे कार्यदलांचे मुख्य उद्दिष्ट आहेत. तसेच, ज्या भागात रोग प्रादुर्भाव झाला आहे / होत आहे त्या भागात विशेष पथके पाठवून योग्य त्या उपाययोजना करणे ही सुध्दा कार्यदलांची जबाबदारी राहील.

सर्व कार्यदलांची सर्वसाधारणपणे दर महिन्यास बैठक आयोजित होईल याबाबतची दक्षता घेण्याची जबाबदारी राज्यस्तरीय कार्यदलाचे सदस्य सचिव यांची असेल, तसेच साथरोग प्रादुर्भाव झाल्यास दर आठवड्याला बैठकीचे आयोजन करून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात आणि वेळोवेळी शासनास लेखी अहवाल सादर करावा लागणार आहे.

राज्य, विभाग, जिल्हास्तरावरील कार्यदलांची कर्तव्ये-

* पशु-कुक्कुट पक्षामधील साथ रोगाची खात्री करणे. याकरिता राज्य / विभाग / जिल्हा स्तरावर त्यांच्या कार्यक्षेत्रामधील अधिकार्‍यांकडून साथरोग विषयक दरमहा अहवाल प्राप्त करून घेण्याकरिता आवश्यक ती कार्यप्रणाली तयार करून तिचा अवलंब करणे (साथरोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सदरचा अहवाला दर आठवड्यास सादर करण्यात यावा).

* पशु-कुक्कुट पक्षांमधील साथ रोगाची वेळेत माहिती प्राप्त करून घेण्यासाठी तीनही स्तरावरील कार्यदलांनी आवश्यक कार्यप्रणालीचा उपयोग करणे,

* उपरोक्त दोन्ही प्रकारची माहिती डेटा व दरमहा / दर आठवड्याला अहवाल सादर करणे, साथरोग नमुन्यांच्या अहवालाचे विश्लेषण करणे तसेच, सर्व जिल्ह्यांमधून रोग नमूने गोळा करणेबाबत उपाययोजना करण्याची जबाबदारी खालील कार्यालयांवर राहील.यासह अन्यही कर्तव्य पार पाडावी लागणार आहे.

असे असेल जिल्हास्तरीय कार्यदल

जिल्हास्तरीय कार्यदल(टास्क फोर्स)नियुक्त करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन उपायुक्ताच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त, जिल्हांतर्गत कार्यरत मेडिसीन, व्हिपीएच/रोग विज्ञानशास्त्र शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक पशुधन विकास अधिकारी सदस्य असतील. तर जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी सदस्य सचिव असतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com