नगर जिल्ह्यात ‘या’ दोन दिवशी वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता

हवामान खात्याचा अंदाज
नगर जिल्ह्यात ‘या’ दोन दिवशी वादळी वार्‍यासह  पावसाची शक्यता
संग्रहित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शनिवारी, रविवारी नगर जिल्ह्यात वादळी वार्‍यासह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या दोन दिवसांत ताशी 40 किमी वेगाने वारेही वाहणार आहेत. हवामान खात्याच्या या अंदाजानंतर जिल्हा प्रशासनाने नगरकरांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

दरवर्षी 1 जूननंतर केरळात बरसणारा मान्सून 31 मेपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर बरसेल असा अंदाज हवामान खात्याने गत आठवड्यात वर्तविला आहे. मात्र यंदा नैऋत्य मोसमी वारे वेळेआधी किनारपट्टीवर येतील असा अंदाज आहे.

नगर जिल्हा प्रशासनालाही हवामान खात्याने ई-मेल पाठवून मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला आहे. 27 ते 30 मे या काळात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह पाऊस पडेल. वीज पडण्याची शक्यता आहे. 29 व 30 मे अर्थात शनिवारी, रविवारी तर जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील असा इशारा देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नगरकरांनी दक्षता घ्यावी असे आवाहन नगर जिल्हा प्रशासनाने केले आहे. वीज पडण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी घरातील कॉम्प्युटर, टीव्हीसारखे वीज उपकरणे बंद ठेवावीत. दूरध्वनी व मोबाईलचा वापर टाळावा.

वीज चमकत असताना घराबाहेर पडू नये. विजेच्या खांबापासून लांब रहावे, झाडाखाली आश्रयास थांबू नये. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी केल्या आहेत. नव्या अंदाजानुसार केरळमध्ये 31 मे पर्यंत मान्सूनचे होणार असून तो वेळेआधी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अंदमानमध्ये सरी कोसळल्यानंतर 7 दिवसांत मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचतो, असा आजपर्यंतचा अनुभव असल्याचे सांगण्यात आले.

अशी घ्या खबरदारी घ्या...

वादळात सुरक्षित ठिकाणा राहा, प्रवास टाळा

विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका

मोबाईलवर बोलू नका, इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहा

अतिवृष्टी, वादळात पर्यटनस्थळी जाऊ नका

आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून धोका पत्कारू नका

मोडकळीस आलेल्या इमारती, पूलावर जाऊ नका

विजेच्या खांबांना हात लावू नका

नगर-आष्टी हद्दीवर मुसळधार

जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचा अंदाज दिलेला असतांना गुरूवारी सांयकाळी नगर आणि आष्टी (जिल्हा बीड) च्या हद्दीवर असणार्‍या पाच ते सहा गावात मुसळधार पाऊस झाला. मांडवे, आष्टी तालुक्यातील कोयाळ, पिंपळा, सुंबेवाडीसह परिसरातील गावांना पावसाने झोडपून काढले. पहिल्याच पावासात या ठिकाणी शेतातून पाणी वाहिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com