हमालांनीच लुटले व्यापार्‍याचे दहा लाख

कर्जत पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल
हमालांनीच लुटले व्यापार्‍याचे दहा लाख

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत शहरातील प्रतिष्ठित आडत व्यापार्‍याकडे काम करणार्‍या दोन हमालांनीच व्यापार्‍याच्या मुलाने बँकेतून काढून आणलेली दहा लाख रूपयांची रोकड हिसकावून पळवुन नेल्याची घटना आज मार्केटयार्ड परिसरात घडली.

सोमनाथ विठ्ठल साळुंके, प्रमोद विजय आतार दोघे (रा. कोरेगाव, ता. कर्जत) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी पियुष रवींद्र कोठारी (20) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मार्केट यार्ड येथील अडत व्यापारी रवींद्र कोठारी यांनी शेतकर्‍यांच्या खरेदी केलेल्या मालाचे पैसे द्यायचे असल्याने कर्जत शहरातील नगर अर्बन बँकेच्या शाखेमधून दहा लाख रुपये काढून आणण्यास मुलगा पियुष यास सांगितले, दरम्यान त्यांच्याच अडत दुकानांमध्ये हमाली काम करत असलेल्या सोमनाथ साळुंके व प्रमोद आतार आमचे गावामध्ये काम आहे ते करून परत आलो असे म्हणून मार्केट यार्डाच्या बाहेर रस्त्यावर येऊन थांबले.

दरम्यान बँकेमधून दहा लाख रुपये काढून बॅगमध्ये ठेवून दुचाकीवरून पियुष मार्केट यार्ड कडे येत असताना संशयितांनी त्यास रस्त्यातच हाक मारली व गाडी थांबवण्यास सांगितले, आपल्याच दुकानातील हमाल हाका मारत असल्यामुळे त्यांच्याजवळ पियुष थांबला असता त्यांनी पियुषच्या दुचाकीला अडकवलेली पैशाची बॅग हिसकावली व दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये सोमनाथ साळुंके व प्रमोद अतार या दोघांवर भादंवि कलम 379, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.